गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन आणि खाटा यांचा तुटवडा : कोरोनाचा कहर चालू असूनही ‘व्हीआयपी’ संस्कृती कार्यरत
‘गार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने ‘गोमेकॉ’च्या अधिष्ठात्यांना (डीनना) पत्र लिहून आरोग्य सुविधेची दयनीय स्थिती केली उघड !
पणजी, २ मे (वार्ता.) – गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेन्शिअल डॉक्टर्स (‘गार्ड’) या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉच्या) अधिष्ठात्यांना पत्र लिहून महाविद्यालयातील आरोग्य सुविधेची दयनीय स्थिती उघड केली आहे. या पत्रातील महत्त्वाची सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१. रुग्णालयात ‘कोविड वॉर्ड’मधील ऑक्सिजनचा पुरवठा एवढा अल्प आहे की, यामुळे ‘एन्.आय.व्ही.’ अन् ‘व्हेंटिलेटर’ योग्य क्षमतेने कार्यरत ठेवता येत नाही. रुग्णांसाठी वापरण्यात येणारा ऑक्सिजन सिलिंडर मध्यरात्री संपतो आणि त्याजागी नवीन ऑक्सिजन सिलिंडर लावण्यासाठी २ ते ३ घंटे किंवा त्याहून अधिक अवधी जातो आणि या काळात रुग्णांना ऑक्सिजनशिवाय रहावे लागते.
२. अत्यवस्थ रुग्णांना ट्रॉली अन् भूमीवर झोपवून ‘व्हेंटिलेटर’ पुरवण्यात आला आहे. ३० खाटांची क्षमता असलेल्या वॉर्डमध्ये सरासरी ५० रुग्ण उपचार घेत आहेत.
३. वरिष्ठ अधिकारी महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन किंवा खाटा यांची कमतरता नाही, अशी नियमितपणे विधाने करत असल्याचे प्रसारमाध्यमातून वाचण्यात येत आहे. यामुळे ‘कॅज्युल्टी’ विभाग अन् कोविड वॉर्ड यांमधील रुग्ण ‘महाविद्यालयात खाटांची कमतरता नसतांना आम्हाला ट्रॉली किंवा व्हीलचेअर किंवा भूमी यांवर का झोपवले आहे ?’, ‘रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा का केला जात नाही ?’, असे प्रश्न रुग्ण विचारत आहेत.
४. रात्री किंवा मध्यरात्री ऑक्सिजन संपल्याने रुग्णाची स्थिती अधिक खालावते किंवा रुग्ण दगावतो. यामुळे निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांचा रोष सहन करावा लागत आहे. रुग्णांचे नातेवाईक साधनसुविधांच्या अभावाचा रोष निवासी डॉक्टरांवर काढत आहेत. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे, तरी डॉक्टरांना अजूनही पुरेशा प्रमाणात सुरक्षा वाढवलेली नाही.
५. कोरोनाचा कहर चालू असूनही महाविद्यालयात प्रामुख्याने ‘व्हीआयपी’ संस्कृती राबवली जात असल्याचे निदर्शनास येते. निवासी डॉक्टरांना या ‘व्हीआयपी’ रुग्णांना पहाण्यास सांगण्यात येते आणि या रुग्णांना जलदगतीने रुग्णालयात भरती करण्यास सांगण्यात येते. या ‘व्हीआयपी’ रुग्णांना प्रवेशाचे निर्बंध नसतात आणि यामुळे २ ते ३ घंटे प्रतिक्षेत असलेले आणि स्थिती अत्यवस्थ असलेले रुग्ण यामुळे निवासी डॉक्टरांशी भांडण करतात. (हे ‘व्हिआयपी’ खासगी रुग्णालयांत का जात नाहीत ? – संपादक)
६. प्रतिदिन नवीन कोविड सुविधा उपलब्ध केल्याची योजना असल्याचे सांगितले जाते; मात्र अतिरिक्त कर्मचारी किंवा डॉक्टर नियुक्त केले जात नाहीत. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, ई.एस्.आय. रुग्णालय आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांव्यतिरिक्त नवीन कोविड सुविधाही निवासी डॉक्टरांनी पहायची का ? आज १ डॉक्टर सरासरी ३० रुग्णांना पहात आहे आणि यामधील काही डॉक्टर २४ घंटे सेवा बजावत आहेत.
गार्डने केलेल्या मागण्या
१. कोविड वॉर्डमध्ये सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहे आणि एकदा बसवल्यानंतर ते सातत्याने कार्यरत आहेत कि नाहीत हेही पहावे.
२. ‘वैद्यकीय सेवा पुरवणार्यांच्या विरोधात हिंसा करणार्यांवर कायद्याने कठोर कारवाई करण्यात येईल’, असे फलक रुग्णालयात सर्वत्र लावावे. कोविड वॉर्ड आणि ‘कॅज्युल्टी’ यांच्या बाहेर पोलीस नेमावा.
३. व्यवस्थापनाने निवासी डॉक्टरांचे प्रश्न तातडीने सोडवावेत अन्यथा काहीतरी विपरीत होऊ शकते. यासाठी तोंडी आश्वासन नको. आरोग्य सुविधेतील त्रुटी त्वरित दूर करा.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी निवासी डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्याचे दिले आश्वासन
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ‘गार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी निवासी डॉक्टरांना सुरक्षा पुरवली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे आणि डॉक्टरांवर रोष व्यक्त न करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.