बंगालमध्ये पुन्हा तृणमूल, आसाम आणि पुद्दुचेरीत भाजप, तमिळनाडूमध्ये द्रमुक, तर केरळमध्ये पुन्हा माकप आघाडी
देशातील ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचा निकाल घोषित
नवी देहली – देशातील ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेश यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे या दिवशी झालेल्या मतमोजणीनंतर लागला आहे. यात बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने गड राखला असून भाजपने आसाममध्ये पुन्हा सत्ता मिळवली आहे. भाजपला केंद्रशासित राज्य पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसचा पराभव करून बहुमत मिळाले आहे, तर केरळमध्ये पुन्हा माकपची डावी आघाडी विजयी झाली आहे. तमिळनाडूत मात्र सत्तापालट झाला असून अण्णाद्रमुक आणि भाजप युतीचा पराभव होऊन द्रमुकला बहुमत मिळाले आहे. आसाम वगळता अन्य सर्व राज्यांत मतदारांनी काँग्रेसला साफ नाकारल्याचे दिसून आले आहे.
Assembly elections: TMC wins in Bengal; BJP in Assam; LDF in Kerala https://t.co/422I04KVd7
— Hindustan Times (@HindustanTimes) May 2, 2021
१. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला २१२ जागा मिळून ती पुन्हा सत्तेत आली असली, तर भाजपने ३ जागांवरून ७९ जागांवर मुसंडी मारली आहे, हे विशेष म्हणता येईल. निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपच्या नेत्यांकडून २०० हून अधिक जागा मिळण्याचा दावा केला जात होता; मात्र तो गाठण्यात भाजपला अपयश आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या विजयामध्ये मुसलमानांच्या मतांचा मोठा वाटा असल्याचा दावा राजकीय तज्ञांकडून केला जात आहे. त्याच प्रमाणे ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांना साहाय्य करण्याचे आवाहन केले होते. त्या पक्षांच्या साहाय्यामुळे ममता बॅनर्जी यांना लाभ झाल्याचेही म्हटले जात आहे. माकप आणि काँग्रेस यांनी भाजपला रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसला आतून साहाय्य केल्याचेही आता म्हटले जात आहे.
२. आसाममध्ये भाजपने सत्ता राखली आहे. एकूण १२६ पैकी भाजपला ७८, तर काँग्रेसला ४६ जागा मिळाल्या आहेत.
३. केरळमध्ये माकपप्रणीत डाव्या आघाडीला ९२, तर काँग्रेसप्रणीत युनायटेड डाव्या आघाडीला ४४ जागा मिळाल्या आहेत. भाजपला येथे केवळ १ जागा मिळाली आहे. मेट्रो मॅन ई. श्रीधरन् भाजपकडून निवडणूक लढवत होते. ते मतमोजणीत आघाडीवर होते.
४. तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकला पराभूत करून स्टॅलिन यांच्या द्रमुक पक्षाला बहुमत मिळाले आहे. द्रमुकला १४५, तर अण्णाद्रमुकला ८८ जागा मिळाल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांच्या पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे.
५. पुद्दुचेरी येथे राष्ट्रपती राजवट लागू होण्यापूर्वी काँग्रेसचे सरकार अल्पमतामध्ये गेल्याने कोसळले होते. त्यानंतर आता झालेल्या निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्ष यांना १३ जागा, तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत.
चुरशीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा पराजय !
निकालाविरोधात न्यायालयात जाणार !
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या चुरशीच्या लढतीत नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. प्रारंभीच्या फेर्यांमध्ये पिछाडीवर असल्याने ममता बॅनर्जी यांचा पराभव होण्याची शंका निर्माण झाली होती; मात्र नंतर बॅनर्जी यांनी मुसंडी मारत भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचा १ सहस्र २०० मतांनी पराभव केला, असे सांगण्यात येऊ लागले; परंतु पुनर्मतमोजणीमध्ये त्यांचा १ सहस्र ६०० मतांनी पराजय झाल्याचे स्वतः ममता बॅनर्जी यांनी घोषित केले. ‘माझा पराजय झाला, तर पक्षाचा विजय झाला आहे. मी निकाल मान्य करते; परंतु निकाल घोषित झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात न्यायालयात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार’, असे त्या म्हणाल्या.
बंगालमध्ये भाजपच्या कार्यालयांवर आक्रमण
तृणमूलचा विजय झाल्यानंतर राज्यात काही ठिकाणी भाजपच्या कार्यालयांवर आक्रमणे करण्यात येत आहेत. एका ठिकाणच्या कार्यालयाला आगही लावण्यात आली, तर एका उमेदवारावर दगडफेक करण्यात आली. भाजपने याविषयी कारवाईची मागणी केली आहे.
विजयोत्सव साजरा न करण्याच्या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश
नवी देहली – निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात राजकीय सभा आदींमुळे कोरोनाच्या संसर्गात वाढ झाल्याने मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला उत्तरदायी ठरवत फटकारले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेश यांच्या मतमोजणीचा निकाल २ मे या दिवशी घोषित झाल्यावर कुणीही विजयोत्साव साजरा करू नये, मिरवणुका काढू नयेत, असा आदेश दिला; मात्र निवडणुकांच्या निकालानंतर बंगाल अन् तमिळनाडू या राज्यांमध्ये विजयी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात विजय साजरा केला गेला. त्यामुळे निवडणूक आयोगाने संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
निवडणूक आयोगाने आदेशात म्हटले आहे की, जे कुणी आदेशाचे उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर गुन्हा नोंदवा. तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये अशा घटना घडत असतील, तेथील पोलीस ठाण्याच्या मुख्य अधिकार्याचे निलंबन करण्यात यावे. अशा प्रकारच्या प्रत्येक घटनेचा अहवाल आयोगाकडे तातडीने सोपवावा, असेही आयोगाने म्हटले आहे.