गृहविलगीकरणातील कोरोनाबाधित रुग्णांवर आता शिक्षकांची दृष्टी रहाणार !
मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश !
संभाजीनगर – कोरोनाची सौम्य लक्षणे झाल्यानंतर ग्रामीण भागातील रुग्ण गृहविलगीकरणात रहाण्याची विनंती करतात. त्यांना तशी अनुमती दिली जाते; मात्र नंतर रुग्ण बाहेर फिरतात आणि संसर्ग वाढतो. त्यामुळे अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे दायित्व प्राथमिक शिक्षकांवर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी नियंत्रण कक्षात शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
ग्रामीण भागातील गृहविलगीकरणात राहिलेल्या रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षात २ ते ५ प्राथमिक शिक्षकांना नियुक्त करण्यात येईल. नियंत्रण कक्षास प्राथमिक वैद्यकीय अधिकार्यांनी गावनिहाय गृहविलगीकरणातील रुग्णांची सूची, त्यांचे दूरभाष क्रमांक द्यायचे आहेत. तसेच प्रत्येक दिवशी नव्याने गृहविलगीकरण केलेल्या रुग्णांची माहितीही द्यायची आहे.