परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘ऑनलाईन’ भावसोहळ्याची सिद्धता करतांना वरसई (पेण) येथील साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त दाखवण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ भावसोहळ्याची सिद्धता करतांना वरसई (पेण) येथील साधकांना आलेल्या अनुभूती

‘कार्यक्रमाची सिद्धता करणार्‍या आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व साधकांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
रानासारख्या ठिकाणी कनात लावून भावसोहळ्याची केलेली सिद्धता

१. सौ. दीपाली दिवेकर

१ अ. गावात भ्रमणभाषला ‘रेंज’ येत नसल्याने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त दाखवण्यात येणारा भावसोहळा पहाता येईल का ?’, असे वाटणे आणि एका ठिकाणी चांगली रेंज येत असल्याचे लक्षात आल्यावर ‘गुरुदेवांचीच कृपा’ असे वाटून मन कृतज्ञतेने भरून येणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ दाखवण्यात येणार्‍या भावसोहळ्याची सिद्धता करायची होती. आमचे घर गावात असल्याने तेथे भ्रमणभाषला रेंज येत नाही. त्यामुळे ‘कार्यक्रम कसा पहाता येणार ?’, असा प्रश्‍नच आमच्यासमोर होता. प्रथम मी आणि माझे यजमान आमच्या मनात विचार आला की, आपण दोघांनी पेण येथे जाऊन कार्यक्रम पाहूया; पण तसे केले असते, तर घरातील सर्वांना कार्यक्रम पहाता आला नसता. आम्ही गावाबाहेर जाऊन २-३ ठिकाणी कुठे चांगली ‘रेंज’ मिळते का ? ते पाहिले. एका ठिकाणी ‘जिओ’च्या नेटवर्कला चांगली ‘रेंज’ मिळत असल्याचे लक्षात आले. तेव्हा ‘गुरुदेवांचीच कृपा’ असे वाटून मन कृतज्ञतेने भरून आले.

१ आ. रानाच्या ठिकाणी स्वच्छता करतांना प.पू. भक्तराज महाराजांचे जुने भक्त असलेल्या एका आदिवासी व्यक्तीने साहाय्य करणे आणि त्यांच्या माध्यमातून प.पू. बाबांचे लक्ष असल्याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटणे : ती जागा घरापासून साधारणतः १० मिनिटे दूर होती. तेथे रान असल्याने प्रथम स्वच्छता करावी लागणार होती; कारण तेथे पुष्कळ पालापाचोळा पडलेला होता. आम्ही कुटुंबियांनी तेथे स्वच्छतेस प्रारंभ केला. इतक्यात शेजारच्या मळ्यात असणारे एक आदिवासी आमच्या साहाय्याला आले. ते प.पू. भक्तराज महाराजांचे जुने भक्त होते. आम्ही स्वच्छता कशासाठी करत आहोत ?, हे ठाऊक नसतांनाही त्यांनी आम्हाला साहाय्य केले. तेव्हा ‘त्यांच्या माध्यमातून प.पू. बाबांचे आमच्याकडे लक्ष आहे’, याची आम्हाला जाणीव होऊन कृतज्ञता वाटली.

१ इ. निळ्या रंगाची कनात बांधल्यावर रान असूनही तेथील वातावरणात चैतन्य जाणवणे आणि सिद्धता करतांना परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येणे : रानातील जागा पूर्ण ओसाड होती. आजूबाजूला काहीच नव्हते. तेथे वातावरणनिर्मिती होण्यासाठी आम्ही बांबू लावून त्यावर निळ्या रंगाची कनात बांधली. त्यानंतर तेथे पुष्कळ चैतन्य जाणवू लागले. जणू असे वाटत होते की, तेथे प.पू. गुरुदेवच आमच्या साहाय्याला आले आहेत ! त्या वेळी त्यांचे अस्तित्वही आम्हाला अनुभवता येत होते. ‘ते आमच्याकडे पहात आहेत’, या भावानेच आम्ही सर्वांनी तेथे सिद्धता केली. त्यामुळे सर्व सिद्धता कधी पूर्ण झाली, ते कळलेच नाही. ज्या अडचणी यायच्या, त्याही लगेचच सुटत होत्या. पूजेची मांडणी करतांना ‘गुरुदेव व्यासपिठावर स्थानापन्न झाले आहेत. आता त्यांची सेवा करायची आहे’, या विचाराने प्रत्येक कृती होत होती.

अशा प्रकारे संघटितपणे आणि भावपूर्णरित्या सेवा केल्याने सर्वांना पुष्कळ आनंद मिळाला. रानासारख्या ठिकाणीही आम्हा सर्वांना भावविश्‍व अनुभवण्यास देऊन आमच्यावर भरभरून कृपा करणार्‍या परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. श्री. संतोष दिवेकर आणि सौ. दीपाली संतोष दिवेकर

२ अ. साक्षात् गुरुदेवच येणार असल्याचा भाव असल्याने रानात बसायचे असूनही सर्वांनी सात्त्विक पोशाख परिधान करणे : ‘आम्ही खरेतर रानात बसून कार्यक्रम ऐकणार होतो. त्यामुळे पोशाख चांगला घालायलाच हवा, असे नव्हते; पण ‘साक्षात् गुरुदेवच तेथे येणार आहेत’, सर्वांचा भाव असल्याने आम्ही सर्वांनी सात्त्विक पोशाख परिधान केला होता. ‘आम्ही सर्वजण कुठेतरी एका मोठ्या उत्सवाला जात आहोत’, असेच वाटत होते. घनघोर आपत्काळातही गुरुदेवांनी हा आनंद अनुभवायला दिल्याने कृतज्ञता व्यक्त होत होती.’

३. सौ. अपर्णा दिवेकर

३ अ. रानात असूनही आश्रमाप्रमाणेच वातावरण अनुभवता येणे : ‘आम्ही भावसोहळा ऐकण्यासाठी रानात बसलेलो होतो, तरीही तेथे आश्रमात असल्याप्रमाणेच वातावरण अनुभवता आले, शांत आणि चैतन्य जाणवत होते. नामजप चालू होता. परात्पर गुरु डॉ. आठवले हे साधकांच्या प्रश्‍नांची उत्तरे देत असतांना माझ्या मनातील प्रश्‍नांची उत्तरेही मला मिळत असल्याचे जाणवत होते.’

४. सौ. निर्मला दिवेकर

४ अ. सोहळ्याला जाण्याची ओढ तीव्र असल्याने घरातील कामे कधी पूर्ण झाली, तेही न कळणे आणि सोहळ्याच्या ठिकाणी केलेली सिद्धता पाहून भावजागृती होणे : ‘सोहळ्याच्या निमित्ताने प्रसाद सिद्ध करतांना मला पुष्कळ आनंद मिळाला. तेथे जाण्याची ओढ तीव्र होती. त्यामुळे घरातील कामे कधी पूर्ण झाली, ते कळलेच नाही. मी घरातील सर्व आवरून सोहळ्याच्या ठिकाणी गेले. सर्वांनी तेथे केलेली सिद्धता पाहून माझी भावजागृती झाली. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.’

५. कु. नंदिता दिवेकर (वय १२ वर्षे)

५ अ. सिद्धतेसाठी एका मुलीने साहाय्य केल्यावर तिच्या माध्यमातून गुरुदेवांनीच साहाय्य केल्याचे जाणवणे : ‘फुलांचे हार आणि पुठ्ठ्याचे कमलपीठ सिद्ध करतांना शेजारच्या एका मुलीने मला साहाय्य केले. तेव्हा ‘तिच्या माध्यमातून गुरुदेवच मला साहाय्य करत आहेत’, असेे वाटून कृतज्ञता वाटली.’

६. कु. वेदश्री दिवेकर (वय ६ वर्षे)

६ अ. सोहळ्याच्या वेळी परमपूज्य अवतीभवती असल्याचे दिसणे : ‘रानातील पालापाचोळा काढतांना ‘गुरुदेवच माझ्याकडून सेवा करवून घेत आहेत’ असे जाणवत होते. ‘सोहळ्याच्या वेळी परमपूज्य माझ्या अवतीभवती आहेत’, असे दिसत होते. ते माझ्याशी बोलत असल्याचेही मला जाणवत होते.’

७. सौ. नम्रता राजेंद्र दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

७ अ. प्रतिकूल स्थितीतही गुरुमाऊलींचा भावसोहळा पहाणारे दिवेकर कुटुंबीय ! : गावासारख्या ठिकाणी भ्रमणसंगणक किंवा प्रोजेक्टरही उपलब्ध होऊ शकत नव्हता. त्यामुळे घरातील सर्वांनी एका भ्रमणभाषवर हा सोहळा पाहिला. खरेतर रानासारखे ठिकाण असल्याने त्यांच्या डोक्यावर छप्पर किंवा अन्य असे काहीही नव्हते. दुपारचे प्रखर ऊन होते. शीतयंत्र (कूलर) किंवा पंखा यांचीही सोय करण्यासारखी स्थिती नव्हती. अशा प्रतिकूल स्थितीत गुरुमाऊलींचा भावसोहळा सर्वांनी पाहिला, हे कळल्यावर ‘कुटुंबियांची किती तळमळ आहे !’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त झाली.’

भावसोहळा पहातांना आलेल्या अनुभूती

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे शुभ्र वेशात दर्शन होणे, त्यानंतर ते नृसिंह आणि शेषशाही रूपात दिसणे अन् ते त्यांचे विष्णुरूप असल्याचे जाणवणे : ‘भावसोहळ्याच्या वेळी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले शुभ्र वेशात दर्शन झाले. त्यानंतर काही ते नृसिंह रूपात आणि थोड्या वेळाने शेषशाही रूपात दिसले. ते पहुडलेले होते. ‘ते विष्णुरूप होते’, असे मला जाणवले. त्यांच्या हाती त्रिशूळ आणि डमरू असल्याचेही जाणवत होते. त्यांच्या भोवती लालसर प्रकाश (ज्वाला) दिसला. ‘पिवळसर बाणासारखी ज्योत पुढे पुढे जात आहे’, असे दिसत होते. ही ज्योत आपत्काळाची जाणीव करून देत असल्याचे जाणवले.’ – श्री. हरिभाऊ दिवेकर, वरसई, पेण.

२. ‘आरतीच्या वेळी भावाश्रू आले आणि परम पूज्य गुरुदेव बोलत असतांना अंगावर रोमांच येत होते.’ – श्री. अनंत दिवेकर, वरसई, पेण.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक