बोगस बियाणांची वाहतूक आणि पुरवठा यांना आळा घाला ! – पालकमंत्री संदिपान भुमरे, यवतमाळ
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
यवतमाळ, १ मे (वार्ता.) – शेतकरी खरीप हंगामाची सिद्धता करत असून कृषी निविष्ठा खरेदीसाठी त्यांची धावपळ चालू आहे. जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतीचे बियाणे, खते, कीटकनाशक आदींचा पुरवठा शेतकर्यांना होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात चोरट्या मार्गाने बोगस बियाणे येत असल्यास त्याची वाहतूक आणि पुरवठा यांवर आळा घालून संबंधितांवर कडक कारवाई करा, असे निर्देश रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी कृषी विभागाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ३० एप्रिल या दिवशी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. शेतकर्याला उच्च प्रतीचे बियाणे, खते आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. बोगस बियाण्यासंदर्भात अनुपालन अहवाल त्वरित सादर करावा. परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून कोणत्याही मार्गाने बोगस बियाणे येणार नाही, यासाठी ‘चेक पॉईंट’वर पोलीस विभागाचे सहकार्य घ्यावे. कृषी सहाय्यकाने गावापर्यंत पोचून शेतकर्यांंना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे; मात्र कृषी साहाय्यक गावात येत नसल्याच्या तक्रारी शेतकर्यांकडून येतात. त्यामुळे कोणत्या दिवशी आणि कोणत्या गावात कृषी साहाय्यक उपलब्ध राहील, याविषयी वेळापत्रक सिद्ध करा. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कृषी साहाय्यक बसला पाहिजे, याविषयी सक्त सूचना कृषी विभागाने द्याव्यात, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.