फलटण (जिल्हा सातारा) येथील पशूवधगृहामध्ये पुन्हा आढळून आले गोवंश !
सातारा, १ मे (वार्ता.) – फलटण येथील पशूवधगृहामध्ये पुन्हा एकदा जनावरे आढळून आल्याने पशूवधगृह कुणाच्या वरदहस्ताने चालू आहे, अशी विचारणा परिसरातील नागरिक करत आहेत. तसेच संबंधितांवर कठोर कारवाईची मागणीही जोर धरू लागली आहे. (यातून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही का करणे आवश्यक आहे, हे लक्षात येते. – संपादक)
फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ३० एप्रिलच्या मध्यरात्री २ वाजता कुरेशीनगर येथे ६ देशी गाई, वासरे आणि १ खोंड अशी ३ लाख ४५ सहस्र रुपयांची जनावरे आढळून आली. या प्रकरणी इरफान याकुब कुरेशी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुणे येथील गोरक्षक निखिल दरेकर, सचिन चित्रे, शादाब मुलानी, नीलेश पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आली. याविषयी पोलीस शिपाई अच्युत जगताप यांनी तक्रार दिली. त्यावरून कुरेशी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.