ईदगाह मैदानातील कामे बंद करण्याची मागणी
कराड, १ मे (वार्ता.) – येथील ईदगाह मैदानातील मुसलमान स्मशानभूमीमध्ये (कब्रस्तान) न्यायालयाचे आदेश डावलून कामे चालू आहेत. ती त्वरित बंद करून अतिक्रमित बांधकामांंवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक तथा हिंदु एकता आंदोलनचे विनायक पावसकर यांनी पालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. मुसलमान स्मशानभूमीविषयी हिंदु आणि मुसलमान समाजात अनेक वर्षे वाद चालू आहेत. त्या जागेत हिंदूंचे श्री उत्तरालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. वर्ष १९३२ मध्ये न्यायालयाने या जागेत कोणतेही बांधकाम, संरक्षक भिंत अथवा पत्र्याची शेड उभारता येणार नसल्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. ती जागा महसूल दरबारी आजतागायत गायरान भूमी म्हणून नोंदीत आहे.
२. वर्ष १९५२ मध्ये या जागेविषयी वाद निर्माण झाला होता. वर्ष १९८६ मध्ये शहर नियोजन (टाऊन प्लॅनिंग) आराखड्याला संमती मिळाली. मुसलमान समाजाकडून या संमतीचा चुकीचा आणि सोयीनुसार अर्थ काढून, तसेच कोरोनासारख्या गंभीर स्थितीचा अपलाभ घेत न्यायप्रविष्ट असलेल्या जागेत शेड उभारण्यास प्रारंभ केला आहे. तसेच इतरही अनुषंगीक कामे चालू केली आहेत.
३. त्यामुळे कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांनी न्यायालयाचा आदर करत ईदगाह मैदानामध्ये चालू असलेली अनधिकृत बांधकामे त्वरित थांबवावी. तसेच आतापर्यंत झालेल्या अनधिकृत बांधकामांवर त्वरित योग्य ती कारवाई करावी.