१ मेपासून निवडक केंद्रांवर प्राथमिक स्वरूपात लसीकरण चालू करता येईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
मुंबई – महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरण चालू करता येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ३० एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना राजेश टोपे म्हणाले, ‘‘नोंदणी केलेल्या नागरिकांना ‘अपॉइंटमेंट’ मिळेल. त्यांनीच संबंधित लसीकरण केंद्रांवर जायला हवे. प्रारंभी जिल्ह्यात एखादे केंद्र चालू असेल. ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांनाच नाममात्र स्वरूपात लसीकरण केले जाईल. आम्ही ‘सिरम’ला पत्र लिहिले होते. त्यांनी ‘मे मासात १३ ते १४ लाख लसीचे डोस देऊ’, असे सांगितले, तर भारत बायोटेक यांच्याकडून ३-४ लाख डोस उपलब्ध होतील. दोन्ही मिळून १८ लाखांपर्यंत लसीचे डोस जातील. ज्यांचा दुसरा डोस घ्यायचा शिल्लक आहे, त्यांना दुसरा डोस द्यावाच लागेल. तो पूर्ण करणे आवश्यक आहे.’’