अकोट (अकोला) येथील वारकरी संप्रदायाचे मृदंगाचार्य ह.भ.प. विठ्ठल महाराज साबळे आणि त्यांची पत्नी गोकुळाबाई साबळे यांचे हृदयविकाराने निधन !
अकोला, ३० एप्रिल (वार्ता.) – वारकरी संप्रदायाचे अकोट येथील मृदंगाचार्य ह.भ.प. विठ्ठल महाराज साबळे (वय ६५ वर्षे) यांचे २८ एप्रिलला पहाटे ५ वाजता, तर त्यांच्या पत्नी गोकुळाताई साबळे (वय ६० वर्षे) यांचे सकाळी ११ वाजता मूर्तीजापूर येथील खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत असतांना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचा मुलगा ऋषि साबळे हाही कोरोनाबाधित असून अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
ह.भ.प. साबळे महाराज हे मृदंगवादन, कीर्तन, भागवत, विशेषतः भाषण शैलीसाठी सुप्रसिद्ध होते. त्यांनी तारुण्यामध्ये श्रीक्षेत्र आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार केला. त्यांनी बरेच मृदंगवादक आणि कीर्तनकार घडवले. सद्गुरु गजानन महाराजांचे शांतीवन अमृततीर्थ प्रगतीपथावर आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
महाराज हे विदर्भ वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांना नुकतेच विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र्र अध्यक्षपदही मिळाले होते. त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी लढवली होती. आंदोलने, मोर्चा, आमरण उपोषण, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम यांमध्ये महाराजांचा सक्रीय सहभाग असायचा.
‘महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे’, अशी प्रतिक्रिया विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी व्यक्त केली.