यवतमाळ जिल्ह्यात खासगी रुग्णालयांना ‘कोविड सुविधा पोर्टल’वर माहिती भरणे बंधनकारक !
बेड आणि रेमडेसिविर उपलब्धतेविषयी नागरिकांना मिळणार माहिती !
यवतमाळ, ३० एप्रिल (वार्ता.) – शासकीय रुग्णालयासमवेतच खासगी कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना योग्य उपचार, बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर आदी गोष्टींची माहिती होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘covidsuvidhaytl’ या नावाने पोर्टल चालू केले आहे. या पोर्टलवर खासगी कोविड रुग्णालयांनी दैनंदिन माहिती भरणे बंधनकारक आहे. सदर माहिती नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांची फसवणूक टाळण्यास साहाय्य होईल.
याविषयी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी २९ एप्रिल या दिवशी खासगी कोविड रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.
कोरोनाबाधित रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारणी होऊ नये, यासाठी खासगी रुग्णालयात निरीक्षक नेमण्यात आले आहेत. निरीक्षकांना त्यांच्या कामात संबंधित रुग्णालयांनी सहकार्य करावे, तसेच आपल्या रुग्णालयातील बेडची उपलब्धता नियमित भरणे, रेमडेसिवीर इंजेक्शन दिलेल्या रुग्णांची नावे, त्यांचा ‘एच्.आर्.सी.टी. स्कोर’, ऑक्सिजन स्तर आदी गोष्टी नियमितपणे पोर्टलमध्ये भरणे आवश्यक आहे.
तसेच रुग्णालयांनी ऑक्सिजन ऑडिट, सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा ऑडिट करावे. कोणत्याही रुग्णाची फसवणूक होणार नाही आणि अतिरिक्त शुल्क आकारणी होणार नाही, याची संबंधित रुग्णालयांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.