कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?
‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
मडगाव रुग्णालय ते स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी खासगी शववाहिका आकारत आहे ८ सहस्र रुपये !
गोवा-मडगाव रुग्णालय ते स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी खासगी शववाहिका ८ सहस्र रुपये आकारत आहे. पणजी महानगरपालिकेचे माजी महापौर उदय मडकईकर यांनाही हा कटू अनुभव आला. माजी महामौर उदय मडकईकर यांच्या एका नातेवाइकाचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयातून थेट स्मशानभूमीपर्यंत शववाहिका हवी होती म्हणून शोध घेतला असता, त्यांना खासगी शववाहिकेने ८ सहस्र रुपये आकारले. यासाठी सरकारी शववाहिका दिली जात नाही. काही जण अशी लूट करत आहेत; मात्र संकटकाळात अशी लूट होऊ नये, यासाठी सरकारची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांची आवश्यकता असलेल्या मागणीच्या विज्ञापनाला एकाचाही प्रतिसाद नाही !
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला अतिरिक्त डॉक्टरांची तातडीने आवश्यकता आहे आणि यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने हंगामी स्तरावर वैद्यकीय अधिकारी या पदावर डॉक्टरांची नेमणूक करण्यासाठी एक विज्ञापन प्रसिद्ध केले होते. आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या या विज्ञापनाला एकानेही प्रतिसाद दिला नाही. याविषयी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘आरोग्य खात्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा सुपर स्पेशालिटी विभाग’ चालू करण्यासाठी साधनसुविधा आणि मनुष्यबळ यांची आवश्यकता आहे. आज परिचारिका किंवा अन्य कर्मचारीवर्ग मिळू शकतात; परंतु डॉक्टर मिळत नाहीत, तरीही या स्थितीतच आरोग्य खाते कार्य करत आहे. आयुष डॉक्टर अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या देखरेखीखाली काम करणार आहेत.’’
मडगाव येथे कोरोनाबाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी उघडपणे फिरत असल्याच्या तक्रारी !
मडगाव शहरात कोरोनाबाधित रुग्ण उघडपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याच्या तक्रारी आहेत. याविषयी एक महिला प्रसारमाध्यमांना म्हणाली, ‘‘कोरोनाबाधित रुग्णांना मी बाजारात फिरतांना पाहिले. कोरोनाबाधित रुग्ण गुपचूपपणे कुटुंबासहित बाजारातील दुकानांमध्ये सामान खरेदी करत आहेत. हे रुग्ण इतरांशी संपर्क येऊ नये, यासाठी कुठलीच काळजीही घेत नाहीत. मी त्यांना याविषयी सांगणार होतो; पण मला त्यांच्याजवळ जायला भीती वाटू लागली. याविषयी आरोग्य केंद्राला कळवले आहे.’’
याविषयी मडगाव आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर म्हणाले, ‘‘कोरोनाबाधित रुग्ण गृहअलगीकरणात रहात आहे ना, यावर देखरेख ठेवण्याचे दायित्व स्थानिक पंचायत आणि पालिका यांना देणे आवश्यक आहे अन्यथा कोरोनाचा संसर्ग वाढणार. आरोग्य केंद्रातील कर्मचारी यावर देखरेख ठेवू शकत नाहीत.’’ मडगाव येथे राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
सातारा जिल्ह्यात ग्रामीण भागात शेकडोंच्या उपस्थितीत विवाह समारंभ झाल्याने काही खेडी ‘हॉटस्पॉट’ !
आपत्काळाचे गांभीर्य जाणून प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी नागरिकांना पाठीशी न घालता शिक्षा पद्धत अवलंबणेच आवश्यक आहे !
सातारा, ३० एप्रिल (वार्ता.) – प्रशासनाकडून विवाह समारंभासाठी २५ व्यक्तींची अनुमती दिली असली, तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेकडोंच्या उपस्थितीमध्ये कोरोना नियमावली धाब्यावर बसवून विवाह पार पडत आहेत. त्यामुळे सध्या अनेक खेडी कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरत आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून अनेक निर्बंध घालण्यात आले असले तरी नागरिकांमधील बेजबाबदारपणा प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. प्रशासनाच्या डोळ्यांत धूळ फेकून स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनातील काही अधिकार्यांना हाताशी धरून वधू आणि वर पक्षाचे लोक विवाह पार पाडत आहेत, अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० |