जलपर्णी काढण्यासाठी मनपा करत असलेली उपाययोजना तात्पुरती ! – पर्यावरणशास्त्रज्ञ सचिन पुणेकर यांची टीका
पुणे शहरातील जलपर्णी काढण्यासाठी मनपाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा व्यय
पुणे, ३० एप्रिल – पावसाळ्यातील संसर्गजन्य रोगांमध्ये जलपर्णीचा मोठा वाटा आहे. विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणारे पाणी आणि रासायनिक द्रव्ये यांमुळे जलाशये प्रदूषित होत आहेत. या दूषित पाण्यामुळे पाण्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णीची समस्या वाढत आहे. गेल्या ५ वर्षांत महापालिकेने जलपर्णीवर ३ कोटी रुपये व्यय केले आहेत; पण समस्या सुटलेली नाही. याविषयी पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले की, नदीमध्ये सोडले जाणारे मैलापाणी थांबणार नाही, तोपर्यंत जलपर्णीची समस्या अल्प होणार नाही. मूळ प्रश्नाला बगल देऊन महापालिका तात्पुरत्या स्वरूपाचे उपाय करत आहे. मैलापाण्यावरील प्रक्रिया प्रकल्प लवकर कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
मुठा नदीतील जलपर्णी काढण्यासाठी ९८ लाख ४० सहस्र ५९० रुपये, तर कात्रजचे दोन तलाव आणि पाषाण तलाव यांसाठी ४९ लाख ९९ सहस्र ७६० रुपये व्यय केले जाणार आहेत. त्यासाठी ‘स्पायडर मशीन’ वापरण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.