महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा प्राचीन इतिहास अन् त्यांची थोरवी !
१ मे २०२१ या दिवशी ‘महाराष्ट्रदिन’ आहे. त्यानिमित्ताने…
‘पुढच्या पिढीला जर त्यांच्यात मराठी भाषेविषयी आपुलकी जागवायची असेल, तर त्यांना महाराष्ट्राची थोरवी कळली पाहिजे. महाराष्ट्र हा गेल्या ५० – ६० किंवा ५०० वर्षांत घडलेला नाही. महाराष्ट्राची जडणघडण बघितली, तर ज्वालामुखीचा उद्रेक होत होत सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली, तेथून आरंभ केला पाहिजे; पण तेवढे मागे जायची आवश्यकता नाही. तापी नदीच्या खोऱ्यामध्ये ३ लाख वर्षांपूर्वीचा आदिमानवाचा सांगाडा सापडला, तेव्हा महाराष्ट्र होता आणि महाराष्ट्रामध्ये लोक रहात होते. त्यापेक्षाही मागे आपण थोडेसे पाहूया. ऋग्वेदाच्या काळात म्हणजे अश्मयुगानंतर लोहयुगाच्या वेळी ऋग्वेदामध्ये महाराष्ट्राचा ‘अपरांतक’ असा उच्चार आहे. अपरांतक म्हणजे पश्चिमेकडचा देश ! भारतामधील पश्चिमेकडचा देश. अपरांतक हा ऋग्वेदकालीन उल्लेख आहे, तो हा महाराष्ट्र !’
भगवान परशुरामाच्या काळामध्ये आलेला महाराष्ट्राचा उल्लेख
त्यानंतर भगवान परशुरामाच्या काळामध्ये म्हणजे साधारणत: ९ सहस्र वर्षांपूर्वीचा इतिहास पाहूया. भगवान परशुरामांनी पूर्ण पृथ्वी २१ वेळा निःक्षत्रिय केली आणि मग ती एका ब्राह्मणाला दान करून स्वतःचे एक वेगळे राज्य निर्माण केले, ते कोकण राज्य अन् मग ते महेंद्र पर्वतावर तपस्येला निघून गेले. तो हा कोकणपट्टा म्हणजे अगदी सूरत, पालघरपासून पूर्ण कोचीनपर्यंतचा. हा जो पट्टा आहे, ती भगवान परशुरामाची निर्मिती ! हा महाराष्ट्र आणि ते जे महेंद्र पर्वतावर गेले, तो आजचा महेंद्रगिरी. तुम्ही आज जर चिपळूणला परशुराम लोटेजवळ गेला, तर तेथील १ सहस्र फूट उंचीचा जो एक छोटासा पर्वत आहे आणि ज्याच्यावर परशुराम लोटेचे मंदिर आहे, त्याला ‘महेंद्रगिरी पर्वतच’ म्हणतात. तो हा महाराष्ट्र !
रामायण आणि महाभारत या काळात महाराष्ट्राविषयी आढळलेला उल्लेख
त्याच्यानंतर रामायण काळी श्रीराम जेव्हा १४ वर्षे वनवासात गेले, तेव्हा ते दंडकारण्यात आले. तेव्हाचे दंडकारण्य म्हणजे आताचे नाशिक म्हणजेच पंचवटी जेथे आजही आपण रामाची पूजा करतो. पंचवटीमध्ये आपण तीर्थक्षेत्र म्हणून जातो. तेथेच सीतेचे अपहरण झाले होते. मारीच राक्षस म्हणा, शूर्पणखा म्हणा, या सर्व घटना महाराष्ट्रातील म्हणजे त्या वेळेचा तो महाराष्ट्र ‘दंडकारण्य’ !
महाभारतामध्ये आपण बघितले, तर महाराष्ट्रामध्ये कुंतल किंवा विदर्भ अशा राज्यांची नावे सापडतात, ती सर्व महाराष्ट्रातील आहेत. जेव्हा युधिष्ठिराने त्याचा द्युतामध्ये पराभव झाला, तेव्हा त्याला सांगण्यात आले होते, त्याची एक गोष्ट आहे. नळ राजा आणि दमयंती यांची. दमयंतीही विदर्भ राजाची कन्या. विदर्भ राज्य कुठे आहे ? तर महाराष्ट्रात. नळदुर्ग किल्ला हा नळाचा किल्ला, हा कुठे आहे ? नळदुर्ग हा धाराशिवमध्ये (उस्मानाबाद) म्हणजे तो आपला महाराष्ट्र. यातून महाराष्ट्राची थोरवी कधीपासून आहे, ते लक्षात येईल. ही सर्व माहिती जोपर्यंत आपण आपल्या तरुण पिढीला सांगत नाही, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र कळणार नाही.
मौर्यकालीन इतिहासामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख आढळणे
महाभारतानंतर आताचा जो इतिहास आहे, जो लिखित इतिहास आपण ज्याला मध्ययुगीन इतिहास म्हणतो. मौर्यकालीन इतिहास साधारण अशोकाच्या काळामध्ये उज्जैनच्या आसपासचा जो परिसर आहे, त्याला ‘राष्ट्र’ असे नाव आहे ‘महाराष्ट्र’. पहिल्यांदा महाराष्ट्राला ‘राष्ट्र’ असे संबोधित जर केले असेल, तर अशोकाच्या काळामध्ये म्हणजे हा बुद्धकाळ म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार जेव्हा होत होता. बुद्धकालीन जे त्यांचे अनुयायी होते, महायान पंथाचे त्यांच्या ग्रंथांमध्ये हा उल्लेख ‘राष्ट्र’ म्हणून आहे आणि तो उज्जैन नगरीच्या खालचा प्रदेश. नर्मदाच्या तीराच्या खालचा प्रदेश आहे, तो म्हणजे महाराष्ट्र.
त्या वेळीही आपल्या राज्याला ‘राष्ट्र’ असे नाव होते. आपण भारतातील सगळ्या राज्यांची नावे पडताळून बघितल्यास लक्षात येईल की, केवळ एकमेव आमचे राज्य असे आहे, ज्याला ‘राष्ट्र’ म्हटले जाते. ज्याच्यामध्ये देश भावना, देशभक्ती आणि राष्ट्रीयत्व आहे. अन्य कुठल्याही राज्याच्या नावामध्ये राष्ट्र हा शब्द नाही आणि तेव्हापासून महाराष्ट्राने आपल्या भारतवर्षावर राज्य केलेले आहे.
शालिवाहन काळापासून मराठी राष्ट्रभाषा !
आपण अगदी सातकरणी, सातवाहन या युगात बघितल्यास लक्षात येईल की, सातवाहनामध्ये त्यांचा एक राजा होता, त्याचे नाव ‘शालिवाहन’. त्याने पुष्कळ मोठा पराक्रम केला. शक आणि कुशाण यांच्या ज्या स्वाऱ्या आपल्यावर होत होत्या म्हणजे आताचे युक्रेन, रशिया येथील शक अन् कुशाण त्यांचा बिमोड केला शालिवाहनाने ! आणि त्या वेळेला जी लढाई कुरुक्षेत्रात (महाभारतही कुरुक्षेत्रात झाले) शालिवाहनाच्या काळात झाली अन् नंतर पेशव्यांच्या पानिपतच्या वेळेलाही कुरुक्षेत्रच गाजले, तर ते कुरुक्षेत्र महाराष्ट्राच्या कह्यात होते.
शालिवाहन हा मराठी राजा. त्याची राजधानी ही प्रतिष्ठान म्हणजे, आजचे पैठण ! एकनाथ महाराजांचे पैठण म्हणजे हा आपला मराठी राजा. या शालिवाहनाने १९४३ वर्षे अगोदर शकांचा पराभव केला. कुरुक्षेत्रात लढाई झाली होती आणि म्हणून तेव्हापासून आपण भारतीय कालगणना ‘शके’मध्ये आपण मोजतो. यावरून मराठी भाषा किती जुनी आहे, ते कळते. भारतात सर्वांत मोठे राज्य शालिवाहनाचे आणि तेव्हा त्याची राष्ट्रभाषा होती ती ‘मऱ्हाटी’. महाराष्ट्र (राष्ट्र) भाषा म्हणजे आताची मराठी राष्ट्रभाषा ! संपूर्ण भारतामध्ये मराठी या राष्ट्रभाषेने अधिक वेळ काळ घालवलेला आहे.
मराठीविषयी आत्मियता वाटण्यासाठी तिचा इतिहास लहानपणापासून शिकवायला हवा !
सातवाहनानंतर चालुक्य आले, यादव आले, राष्ट्रकुट आले हे सगळे मराठी राजे. यांनी भारतावरती राज्य केले. ही आहे मराठीची आणि मराठी राजांची थोरवी ! महाराष्ट्र आमचा तेव्हापासूनचा आहे. त्यानंतर अनेक वर्षे मोगलांच्या खाली आपले महाराष्ट्र होते. साधारण ४०० वर्षे आपण मोगलांचे राज्य अनुभवले. त्या वेळेला जर सर्वांत पहिल्यांदा यवनांच्या विरोधात लढाई करून ५ पातशाह्यांविरुद्ध लढाई करून त्यांना चित करून जर कुणी स्वराज्याची स्थापना केली असेल, तर तो आमचा मराठी राजा छत्रपती शिवाजी महाराज ! अभिमानाने घ्यावे असे हे नाव आणि त्यानंतरचा मग तुम्हाला इतिहास माहिती आहे संभाजी महाराजांचा अन् पेशव्यांचा ! पेशव्यांनी तर अगदी देहलीपर्यंत राज्य केले. पेशव्यांच्या राघोबादादांनी अटकेपार झेंडे फडकवले. अटक कुठे आले ? आताच्या अफगाणिस्तानची सीमा म्हणजे हिंदू कुश पर्वतावर. तेथे आपला भगवा झेंडा लागलेला आहे मराठ्यांचा. ओडिशाला कटकपर्यंत राज्य होते मराठ्यांचे ! म्हणजे अख्खा भारत मराठी आधिपत्याखाली होता. ही मराठीची जी माहिती आहे, ती आपल्या पुढच्या युवा पिढीला, लहान मुलांना लहानपणापासून जर शाळेमध्ये शिकवली, तर मग त्यांना मराठीविषयी आत्मियता राहील. महाराष्ट्र राज्याचा अभिमान राहिल आणि मग ही माणसे मराठीकरता तळमळीने पेटून उठतील.
मध्यप्रदेशसह उत्तरेतील काही राज्यांची राजभाषा मराठी असणे
मध्यप्रदेशची राज्य भाषा वर्ष १९५६ पर्यंत मराठी होती. किती लोकांना माहिती आहे ? १९५६ म्हणजे आता स्वातंत्र्यानंतर वर्ष १९५६ पर्यंत मध्यप्रदेशची राज्य भाषा ही मराठी होती. आपण झोपलो आहोत, निद्रिस्त आहोत, आपण मागणी केली नाही; म्हणून हिंदी झाली. मध्यप्रदेशची भाषा हिंदी कधीच नव्हती. मध्यप्रदेशची भाषा बुंदेली, बगेली, गोंड, अवधी आणि मराठी आहे. मध्यप्रदेशमध्ये अधिकाधिक संख्येने मराठी भाषिक आहेत. मध्यप्रदेशवर राज्य कुणी केले ? होळकर, मराठी सरदार शिंदे, सुमित्रा महाजन की, ज्या आपल्या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या. हे सर्व मराठीच आहेत.
झाशीची राणी मराठी नेवाळकर ! झाशीच्या राणीचे बालपण पुण्यात गेले. तांबे हे मराठी, बडोद्याचे गायकवाड मराठी, पवार मराठी या सर्वांनी उत्तरेवर राज्य केलेले आहे. त्यामुळे मराठी भाषा तेव्हा राष्ट्रभाषा होती ना ! मराठ्यांच्या काळामध्ये राष्ट्रभाषा काय होती ? हिंदी होती ? हिंदीची तर उत्पत्तीही झाली नव्हती. पेशव्यांच्या काळापर्यंत हिंदी भाषा हा शब्दच नव्हता.
मराठी ही ‘अभिजात’ भाषा !
हिंदी भाषा हा शब्दप्रयोग चालू झाला दीडशे वर्षापूर्वी. म्हणजे वर्ष १८५७ च्या लढाईच्या वेळेलाही हिंदी भाषा हा शब्दप्रयोग नव्हता. मराठी भाषा होती. मराठी भाषेचा इतिहास २ सहस्र २२० वर्षांचा आहे आणि म्हणून ‘मराठी ही अभिजात दर्जाची भाषा आहे.’ हिंदीला सव्वाशे – दीडशे वर्षांचाही इतिहास नाही. तुम्हाला जर विचारले की, हिंदीचा एखादा जुना साहित्यिक किंवा लेखक सांगा, तर आपण अधिकाधिक प्रेमचंद मुन्शीपर्यंत पोचतो.
मराठी भाषिकांचा इतिहास सर्वांना वारंवार सांगायला हवा !
ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली. त्याला ७५० वर्षे झाली. त्याच्या आधी चांगदेव. चांगदेवांचे आयुष्य १ सहस्र ४०० वर्षे सांगतात, म्हणजे मराठी भाषा किती वर्षे जुनी असेल. त्याच्याही आधी चक्रधर. त्याही आधी हे म्हटले की, बौद्धकालीन म्हणजे इसवी सनापूर्वी जे ग्रंथ लिहिले आहेत, त्याच्यामध्ये मराठीचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये उज्जैन हे महाराष्ट्र किंवा राष्ट्र या भाषेमध्ये हा उल्लेख आहे. पुण्याला लोणावळ्याच्या जवळ जी कार्ल्याची लेणी आहे, ती म्हणजे एकवीरादेवी. आता लोक एकवीरा म्हणतात. ही बुद्ध लेणी कोरण्याकरता पैसा लागला. हा पैसा दिला सोपाऱ्यातील धनिकाने म्हणजे आताचा नालासोपारा. म्हणजे हा मराठी भाषिकांचा इतिहास आहे; पण हा वारंवार लोकांना समजावून सांगितला पाहिजे. आपणच आपला गौरव नाही सांगितला, तर लोकांना कसे कळणार ? मराठीचा मोठेपणा काय आहे, हे कळले पाहिजे. हा इतिहास आणि मोठेपणा आपण स्वतःहून लोकांना सांगितला पाहिजे. कोणतेही सरकार शिकवणार नाही आणि पाठ्यपुस्तकात दिसणार नाही. इतिहासात सापडेल, बखरीत सापडेल, पुस्तकात सापडेल, कोकणाख्यानात सापडेल, ऋग्वेदात सापडलेला आहे; पण हा आपण लोकांना सांगितला पाहिजे, तरच लोक याचा अभ्यास करतील.
मराठी भाषेला ‘राष्ट्रभाषा’ म्हणून घोषित करा !
भारतीय संघराज्याला २२ राज्यभाषा आहेत. ब्रिटिशांनी कधी राष्ट्रभाषा लावलीच नाही; कारण इंग्रजी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. मग त्याच्या आधी कुणाचे राज्य होते ? मराठ्यांचे राज्य होते ना, अगदी अटकेपासून कटकपर्यंत. महाराष्ट्राची राष्ट्रभाषा कुठली हो ? मराठीच ना ! सगळा राज्य कारभार मराठीत होत होता ना ! म्हणजे शेवटची राष्ट्रभाषा भारताची ती मराठीच आहे. मग आज राष्ट्रभाषा मराठी का नको ? आपण राज्य भाषा म्हणून लढतो आहे, झगडतो आहे. मराठीला मान द्या आणि राष्ट्रभाषा मराठी करा !
(संदर्भ: व्हाट्सअप)