हिंदु राष्ट्रविरांना श्रीविष्णूच्या धर्मध्वजाचे आवाहन !

१ मे या दिवशी असलेल्या महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने…

राष्ट्र आणि महाराष्ट्र या संकल्पनेशी मी लहानपणापासून जोडला गेलो. माझा मोठा काका महाराष्ट्र मुक्तीसंग्रामात हुतात्मा झाला आणि आमचे पूर्ण घर महाराष्ट्राला जोडले गेले. त्यामुळे राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्व याचे बाळकडू परात्पर गुरुदेवांनी लहानपणापासूनच देण्याचे नियोजन केले होते. जसे शिवराय महाराष्ट्राचे, हिंदवी स्वराज्याचे होतेच, तसेच ते संपूर्ण हिंदुस्थानाचेही आहेत. श्रीगुरूंनीच जणू हे सर्व घडवले, असे वाटून कृतज्ञता वाटली. महाराष्ट्रातून हिंदु राष्ट्राकडे जातांना शिवरायांचा, कृष्णाचा, रामाचा, हनुमंताचा आणि श्रीविष्णू यांचा भगवा ध्वज हिंदु राष्ट्रविरांना आवाहन करतो आहे समर्पणाचे ! १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राष्ट्र ही संकल्पना प्रत्येक हिंदु युवकांच्या मनात निर्माण होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला प्रत्येक युवकाने स्वत:ला झोकून देण्यासाठी श्रीविष्णूच्या धर्मध्वजाचे आवाहन आज श्रीविष्णुस्वरुप परात्पर गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे.

वि.स. खांडेकरांनी लिहिलेली ही कविता वाचतांना श्रीविष्णूचे भव्यदिव्य रूप डोळ्यासमोर होते, श्रीविष्णु सिंहासनावर आरूढ झाले होते आणि त्याच्या मेघडंबरीवर हा केशरी धर्मध्वज डौलाने फडकत आवाहन करत होता….

श्री. सुमित सागवेकर

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
विजश्रीला श्रीविष्णुपरी भगवा झेंडा एकचि हा

रणीं लाखो झेंडे फडकतात ते हिरवे असतील, लाल असतील, रंगीबेरंगी असतील; पण विजयश्रीला खेचून आणणारा केवळ आणि केवळ विजयाचा इतिहास निर्माण करणारा, सूर्यापरी केशरी अवतार धारण केलेेला, युगानुयुगे धर्माचे प्रतीक असणारा श्रीविष्णूचा भगवा ध्वज एकमेवाद्वितीय आहे. हा केशरी धर्मध्वज आज आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेचे आवाहन करतो आहे.

शिवरायाच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाचि
दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची
तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता
पाश पटापट तुटती त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा
लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी
अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई
अधर्म लाथेने तुडवी
धर्माला गगनी चढवी
राम रणांगणी मग दावी

हाच विष्णूचा आणि राम-कृष्णांचा केशरी धर्मध्वज शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा राष्ट्रध्वज होता, तोच हिंदु राष्ट्राचा राष्ट्रध्वज आहे. शिवरायांच्या वज्रासम शक्ती या धर्मध्वजात आहे. सह्याद्रीचे हृदय म्हणजे पराक्रमाच्या भूमीचे आणि शौर्याचे हृदय या धर्मध्वजाचे आहे. दर्या म्हणजे समुद्र जरी खवळून उठला, त्याला उधाण आले आणि घनघोर वादळ झाले, तरी तो तीळभर सुद्धा ढळणार नाही, अशी या धर्मध्वजाची काठी आहे. ही काठी आपल्याला ईश्वरनिष्ठेची शिकवण देत आहे. आपणही आपल्या संकटसमयी तीळभरही न ढळण्यासाठी आपल्याला ईश्वराची भक्ती करून त्याचे भक्त होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करायला हवे. आपले पंचप्राण घेऊन त्रेतायुगात वानरांनी, द्वापरयुगात पांडवांनी आणि कलियुगात मावळ्यांनी या भारतवर्षासाठी संघर्ष करून ईश्वरी अधिष्ठानाने शत्रूचे पाश खळाखळा तोडून टाकले आणि विजयाचा ध्वज या मातृभूमीवर फडकवला.

रामचंद्रांच्या लीलेने स्वत: श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमंतासह सर्व वानरांनी रावणासमवेत कित्येक असुरांना नष्ट केले. कृष्णलीलेने मोठ्या राक्षसांचा नाश केला आणि राम-कृष्णांच्या नीतीचा अवलंब करत गनिमी काव्याने अन् असीम शौर्याने छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला. या सर्वांनी आपल्याला मोहक मायेच्या हृदयी खंजीर खुपसायचा असतो म्हणजे माया तोडून परमार्थ साधण्याचा संदेश दिला. त्याचप्रमाणे हा धर्मध्वज आपल्याला सांगतो आहे की, या भारत भूवर असंख्य रुधीरांच्या धारांनी म्हणजे त्यागाचे रक्त सांडून आणि समर्पित होऊन मग हा ध्वज फडकवला गेला. याला अनेकांचे शौर्य, बलीदान, त्याग आणि समर्पण आहे. तुम्हीही मोहक मायेच्या हृदयात अडकू नका किंवा फसू नका. ‘विजयाचा इतिहास निर्माण करण्यासाठी माझे आवाहन स्वीकारा आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध व्हा’, असे आपल्याला हा श्रीविष्णूचा ध्वज सांगत आहे. अधर्म हा लाथेने तुडवड्यासाठीच असतो म्हणजे नष्ट करण्यासाठीच असतो; कारण आपल्याला धर्माला गगनी चढवायचे असते, म्हणजे धर्माची स्थापना करायची असते. म्हणून राम, कृष्ण आदींना आचरून आणि धर्माचे आचरण करून त्यांच्या आदर्शाने चालून जर या हिंदु राष्ट्राच्या कार्यात आपण उतरलो, तरच त्या संघर्षात राम उभा राहील. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेत राम असणे आणि तो रणांगणी दिसणे आवश्यक आहे, म्हणजे देव मस्तकी धरून आपण धर्मसंस्थापनेचे कार्य करणे अपेक्षित आहे’, असे आवाहन श्रीविष्णूचा भगवा ध्वज करत आहे.

कधी न केले निजमुख काळे पाठ दावूनी शत्रूला
कृष्णकारणी क्षणही न कधी धर्माचा हा ध्वज दिसला
चोच मारण्या परव्रणावर काकपरि नच फडफडला
जणू जटायू रावणमार्गी उलट रणांगणी हा दिसला
परलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे
श्वासा-श्वासासह सत्याचे संचरती जगती वारे
गगनमंदिरी धाव करी
मलिन मृत्तिका लव न धरी
नगराजाचा गर्व हरी उंच शीखर आहे गर्व हरतो

पुढे हा धर्मध्वज सांगतो आहे की, धर्माचा इतिहास असा आहे की, देवाची लीला सोडली, तर शत्रूला पाठ आम्ही कधी दाखवली नाही. काळी कर्म करण्यासाठी हा ध्वज कधीच फडकला नाही; पण धर्म जगायला जटायूसारखे पक्षीही रामराज्यासाठी जर रणांगणी उतरून प्राणांची आहुती देऊन धर्मध्वज फडकवत असेल, तर आपण का मागे आहोत ? परलक्ष्मीला (परस्त्रीला) पळवायला म्हणजे आम्ही कुणावर कधी दरोडे टाकले नाहीत, लक्ष्मीसाठी कुणासमोर कधी हात पसरला नाही, कधी कुणावर अन्याय केला नाही कि कुणावर आक्रमण केले नाही. आमच्या इतिहासाच्या परंपरेच्या दैवी कार्याच्या श्वासा-श्वासात केवळ सत्याचे वारेच पसरले आहे आणि ही ख्याती विश्वभर पसरलेली सर्वानुभूषित आहे, अशी गगनमंदिरी स्थान असणारी सत्याची, विजयाची आणि धर्माची परंपरा आमुची आहे. या राम-कृष्णांच्या म्हणजे साक्षात् विष्णूच्या पदस्पर्शाने पावन पवित्र झालेल्या या भूमीमध्ये मलिनतेचा लवलेशही नाही. हे जे विष्णुपरंपरेचे आणि रुद्रपरंपरेचे सत्याचे अन् आमच्या गौरवाचे शिखर आहे, त्यापुढे डोंगरांचा राजा असलेल्या हिमालयासारखे उंच शिखरही ठेंगणे होते, त्याचा गर्व हरला जातो. म्हणून हा ध्वज आपल्याला आवाहन करतो आहे की, ‘या धर्माचे पाईक असतांना आपण का मागे रहायचे ? सत्याच्या राष्ट्रासाठी म्हणजेच हिंदु राष्ट्रासाठी पुढे सरसावण्याची वेळ आता आली आहे. चला उठा आणि हिंदु राष्ट्र स्थापनेस देव मस्तकी धरून मार्गस्थ व्हा !’

मुरारबाजी करि कारंजी पुरंदरावर हृदयाची
सुकली कुठली दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची
संभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी|
अमर तयाच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी
खंडोजी कुर्वंडी कन्याप्रेमे प्रभुचरणावरूनी
स्वामिभक्तीचे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनी
हे सिंहासन निष्ठेचे
हे नंदनवन देवाचे
मूर्तिमंत हा हरि नाचे

श्रीविष्णूचा ध्वज पुन्हा पराक्रमाची उदाहरणे देऊन आपल्याला आवाहन करत आहे, पुरंदरावर मुरारबाजींनी हृदयातील रक्ताचे कारंजे केले म्हणजे रक्तरंजीत धर्मक्रांतीने शौर्य गाजवलले धर्मासाठी, राष्ट्रासाठी. हे बलिदान, शौर्य, असीम पराक्रमच या ध्वजराजाची दौलत आहे, धर्मवीर संभाजी महाराज तर निस्सीम राष्ट्रप्रेमाचे अन धर्मप्रेमाचे मूर्तीमंत उदाहरण आहेत. त्यांच्या हृदयी राष्ट्रप्रेमच ओतप्रोत भरले होते. आजही त्यांच्या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या, त्यागाच्या आठवणी आम्हाला निधड्या छातीने धर्म-राष्ट्र रक्षणास उभे रहाण्यास शिकवतात. अशा अनेक धर्मयोद्धयांनी आपला जीव राष्ट्र-धर्माच्या धर्मसंस्थापनेसाठी देवाच्या चरणी ओवाळून टाकला. त्रेतायुगात हनुमान, भरत, सुग्रीव, द्वापरात अर्जुनासह पांडव, कलियुगात बाजी, येसाजी, तानाजी यांच्यासारख्यांच्या स्वामीभक्तीच्या अतुलनीय तेजाने हा ध्वज गगनी चमकत आहे. हे स्वराज्याचे सिंहासन निष्ठेचे आहे. भारतवर्षाचे नंदनवन देवाचे आहे. या भूमध्ये सदैव हरिचा वास असतो. त्यामुळे ‘आता हा धर्मध्वज भारत भूवरी फडकवण्यासाठी सिद्ध व्हा’, असे आवाहन आपल्याला श्रीविष्णूचा हा केशरी ध्वज करत आहे.

स्मशानतल्या दिव्य महाली निजनाथासह पतिव्रता
सौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता
रमामाधवासवे पोचता गगनांतरि जळत्या ज्योती
चिन्मंगल ही चिता झळकते या भगव्या झेंड्यावरती
नसून असणे, मरून जगणे राख होऊनी पालवणे
जिवाभावाच्या जादूच्या या ध्वजराजाला हे लेणे
संसाराचा अंत इथे
मोहाची क्षणी गाठ तुटे
धुके फिटे नवविश्व उठे

आम्ही आमच्या भारतभूमीला मातृभूमी म्हणतो, मातृ म्हणजे आई एक स्त्री, आमच्या राष्ट्र-धर्माला पतिव्रता स्त्रीची परंपरा लाभली आहे.  आमची स्त्री कशी होती ? मैथिली पतिव्रता होती. इतके वैभवसंपन्न असतांना सुद्धा श्रीरामांसह वनवासाला निघाली. ती स्वत: अग्निची पुत्री होती. त्यामुळे तिला लंका दहनाच्या वेळी काही होऊ शकले नाही. मारुतीलाही अग्नीरक्षणाचा वर देणारी ही सीतामाता होती. पतिव्रतेची साक्ष म्हणून स्वत: अग्निपरीक्षा देणारी ही अमुची स्त्री आमच्याकडे पतिव्रता म्हणून सती जाण्याची पद्धत होती. त्यातील उद्देश पतिव्रतेच्या अग्नीदिव्याचा होता. छत्रपती शिवरायांची पत्नी सुद्धा त्यांच्यासह सती गेली. आमच्या मावळ्याच्या घरी असणार्या त्याच्या पत्नीची सिद्धता काय होती, यावरून आमची हिंदु स्त्री काय होती, हे आम्हाला लक्षात येईल. ती आपल्या नवर्याला कधीच घरी थांबा सांगायची नाही. युद्धाला जाणार्या आपल्या नवर्याला तो कधी येणार ? येईल कि नाही ? हे ठाऊक नसतांनाही आरतीचे ताट घेऊन ओवाळायला ती दारात मळवट भरून उभी असायची. पती युद्धात असतांना त्या पतिव्रतेच्या मनात पतीला काय होईल, ही काळजी नसायची, तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी निष्ठा, धर्माचा अभिमान आणि भगवी पताका हेच मनी घेऊन ती स्त्री जीवन जगायची. धन्य ती स्त्री आणि तिचे व्रत ! रमा-माधवांच्या जळत्या ज्योती याच पतिव्रतामुळे गगनी पोचल्या होत्या.

हा धर्मध्वज, अग्नीप्रमाणे झळकणारा भगवा ध्वज बघितला की, आठवण येते ती चित्तोडच्या राणी पद्मावतीची. शत्रूला हिंदु स्त्रीचे शील मिळायला नको, हिंदु स्त्रीचा सन्मान राखला गेला पाहिजे, पुढील अनेक वंशाच्या हिंदु स्त्रियांचा विचार करून राणी पद्ममावतीने सहस्त्रो स्त्रियांसमवेत स्वत:च्या देहाचा जोहार केला. याला पतिव्रता म्हणतात. अंकुर कधी येतो ? त्याला योग्य खतपाणी केले की, ते चांगले येते. त्याचप्रमाणे ही हिंदूंची पवित्र भूमी या पतिव्रता स्त्रियांच्या, वीर योद्ध्यांच्या राखेने प्रसवली गेली आहे आणि त्यातूनच असंख्य वीर प्रसवले गेले अन् त्यांनी या भूमीला अखंड विजयी ठेवले. त्याप्रमाणेच आम्हालाही या मातृभूमीला पुन्हा स्वातंत्र्य करण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापित करायचे आहे.

या झेंड्याचे हे आवाहन हरहर महादेव बोला
उठा हिंदूंनो अंधारावर घाव निशाणीचा घाला
वीज कडाडून पडता तरु(भूमी)वर कंपित हृदयांतरि होती (घाव झेलणे-घालणे)
टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती
झंजावाता पोटी येऊन पान हलेना हाताने (मनगटाची)
कलंक असला धुवुन काढणे शिवरायाच्या राष्ट्राने
घनचक्कर या युद्धात
व्हा राष्ट्राचे राऊत (सारथी वाहून नेणारा)
कर्तृत्वाचा द्या हात

शेवटी हा भगवा ध्वज आपल्याला आवाहन करतो आहे, ‘आता हर हर महादेव बोला ! हर हर महादेवची शौर्य गर्जना करून उठा ! उठा हिंदूंंनो, आता अंधारावर निशाणी धरून त्यावर घाव घाला.’ होय, आता वेळ आली आहे संकटाला परतावून लावण्याची ! अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आता उठा आणि सिद्धता करा हिंदु राष्ट्र स्थापण्याची ! हा घाव असा असला पाहिजे, ज्याप्रमाणे वीज कडाडून भूमीवर पडल्यावर भूमी जशी कंपित होऊन ती भंगही होते. त्याचप्रमाणे हिंदूंनो धर्मरक्षणास, राष्ट्ररक्षणास आणि हिंदु राष्ट्र स्थापन करण्यास संघर्षाचे अन् संकटांचे घाव झेलण्यास ही निधडी छाती सिद्ध ठेवा. तसेच याच निधड्या छातीचा कोट करून संकटावर आणि षडरिपूंवर (अहंकारावर) घाव करण्यासाठीही सिद्ध व्हा ! आमची राष्ट्र-धर्मावरील संकटांशी आणि षडरिपूंशी टक्कर अशी असली पाहिजे, जशी त्या धक्क्याने हे अहंकाराचे, संकटांचे दगडही फुटून मातीला मिळून मातीमोल होतील.

हिंदु युवकांनो, आमच्या धर्मतेजाच्या आणि राष्ट्रतेजाच्या तलवारीच्या मनगटाला आता भक्तीची शक्ती हवी. हिंदुत्वाचा आणि हिंदु राष्ट्राचा झंझावात आता हिंदु युवकांच्या माध्यमातून संपूर्ण हिंदुस्थानात निर्माण झाला पाहिजे. शिवरायांच्या राष्ट्राने आणि श्रीरामाच्या रामराज्यानेे या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेने आमच्या मायभूवरील कलंक आम्हाला धुवून काढायचा आहे. मातृभूमीवरील आणि धर्मावरील सर्व संकटे आम्हाला मिटवायची आहेत. आपल्याला हा श्रीविष्णूचा धर्मध्वज आवाहन करत आहे, ‘या घनचक्कर युद्धामध्ये, या धर्म-अधर्माच्या लढ्यामध्ये, या हिंंदु राष्ट्र स्थापनेच्या संघर्षामध्ये तुम्ही या हिंदु राष्ट्राचे राऊत म्हणजे सारथी व्हा ! हिंदु राष्ट्राकडे वाहून नेणारे व्हा ! आता हिंदु राष्ट्र्रासाठी तुमच्या अतुलनीय पराक्रमी अन् शर्थीच्या शौर्याच्या कर्तृत्वाची आवश्यकता आहे.

भगव्याचे आवाहन स्वीकारा !
भगव्याचे आवाहन त्यागाचे आहे,
भगव्याचे आवाहन समर्पणाचे आहे,
भगव्याचे आवाहन पराक्रमाचे आहे,
भगव्याचे आवाहन शौर्य उपासनेचे आहे,
भगव्याचे आवाहन बलोपासनेचे आहे,
भगव्याचे आवाहन भक्तीभावाचे आहे,
भगव्याचे आवाहन क्षात्रभावाचे आहे,
भगव्याचे आवाहन शक्ती युक्ती भक्तीच्या संगमाने,
भगव्याचे आवाहन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे आहे !

शेवटी एकच सांगावेसे वाटते,
प्रणाम घ्यावा माझा हा श्री हिंदु राष्ट्र देशा !
हनुमंताच्या देशा तू, रामाच्या देशा कृष्णाच्या देशा तू, साधूसंतांच्या देशा ।
क्रांतीवीरांच्या देशा तू, शिवरायांच्या देशा
शौर्याच्या देशा तू, पराक्रमाच्या देशा
भक्तीच्या देशा आणि तू शक्तीच्या देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री हिंदु राष्ट्र देशा !

हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांच्या विष्णुरूपाच्या दर्शनाने त्यांच्याच या धर्मध्वजाचे आवाहन मला लिहिता आले, हे त्यांच्या कृपेविना कसे होणार. तेच कर्ता करविता आहेत, त्यांच्या चरणी कोटी कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त करतो !

–  श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (२८.०४.२०२१)