महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर २०२१ मध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल ! – डॉ. शशांक जोशी, सदस्य, कोरोना टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य
|
मुंबई – महाराष्ट्रामध्ये श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीमध्ये, म्हणजेच सप्टेंबर २०२१ मध्ये (भाद्रपद मासात) कोरोनाची तिसरी लाट येईल, असे मत महाराष्ट्र राज्याच्या ‘कोरोना टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.
जोशी पुढे म्हणाले,
१. महाराष्ट्रातील दुसरी लाट २१ मे ते १५ जून या कालावधीत ओसरेल; पण तिसरी लाट १०० टक्के येणार, याविषयी कोणतेही दुमत नाही.
२. अधिकाधिक लोकांचे लसीकरण केल्यास या लाटेत होणारा कोरोनाचा संसर्ग न्यून होईल.
३. तिसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी; पण दुसर्या लाटेपेक्षा थोडी अल्प असणार आहे. केवळ तिसरीच नव्हे, तर चौथी आणि पाचवी लाटही येणार आहे.
४. गलथानपणा केला, तोंडाला मास्क लावले नाही, सुरक्षित अंतर ठेवण्याचा नियम पाळला नाही, गर्दी केली, तर सप्टेंबरपर्यंत तिसरी लाट येईल. कोरोना अजून ३-४ वर्षे रहाणार आहे.
५. कुठल्याही विषाणूच्या लाटा येतातच. अमेरिकेतील मिशिगन आणि फ्रान्स येथे सध्या कोरोनाची चौथी लाट आली आहे. लाट येणारच आहे; पण त्याची दाहकता न्यून करण्याच्या दृष्टीने चर्चा करता येईल. या विषाणूच्या संदर्भात अधिक संशोधन करायला हवे.
६. अनेकांचे लसीकरण झाल्यास चौथी आणि पाचवी लाट कधी येऊन गेली, ते कळणारही नाही. ‘हर्ड इम्युनिटी’साठी ८० टक्के लोकांचे लसीकरण करावे लागेल; पण ते अशक्य आहे. त्यामुळेच जोपर्यंत आपण कोरोनासंदर्भात शिस्त लावणार नाही, तोपर्यंत आपण कोरोनावर मात करू शकणार नाही.