कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?
‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
४ रेमडेसिविर इंजेक्शन देत असल्याचे सांगून तरुणांकडून फसवणूक
सहस्रावधी रुपये अनोळखी व्यक्तींच्या हाती सोपवून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका ! स्वतः सतर्क राहून सावधानता बाळगणे आवश्यक !
नवी मुंबई, २९ एप्रिल (वार्ता.) – रेमडेसिविरची ४ इंजेक्शने आणून देत असल्याचे सांगून ८८ सहस्र रुपयांची फसवणूक करणाऱ्याना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. सुकापूर (पनवेल) आणि माणगाव येथून सौरभ बोनकर, अनिकेत तांडेल, तसेच आकाश म्हात्रे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा शासकीय यंत्रणेच्या देखरेखीखाली होत असल्याने अशा प्रकारे खासगी लोकांना पैसे देऊन स्वत:ची फसवणूक करून घेऊ नका’, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी केले आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराचे काका पुणे येथे रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असून त्यांना ४ रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता होती. त्यांच्या मित्राने इंजेक्शन मिळवून देणाऱ्या अनिकेत याचा संपर्क क्रमांक दिला. अनिकेतने त्यांच्याकडून ८८ सहस्र रुपये घेऊन इंजेेक्शन आणून देत असल्याचे सांगितले. तो तेथून गेला; पण पुन्हा आलाच नाही. मित्राने अनिकेतला संपर्क केल्यावर त्याने ‘पोलिसांनी माझ्याकडील पैसे आणि इंजेक्शन कह्यात घेतले आहे. तुम्ही परत संपर्क करू नका, अन्यथा मी तुमचे नाव पोलिसांना सांगतो’, अशी भीती घातली. या प्रकरणी शंका आल्याने पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली. आरोपींनी ८८ सहस्र रुपये आपापसांत वाटून घेऊन संबंधितांची फसवणूक केल्याचे उघड झाले.
ऑक्सिजनअभावी नगर येथील एका खासगी रुग्णालयातील ७ जणांचा मृत्यू
नगर, २९ एप्रिल – येथे ऑक्सिजनची तीव्र टंचाई आहे. जिल्ह्यासाठी प्रतिदिन ६० मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. तसेच सर्व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर कोणतेही नियोजन होत नसल्याचे दिसते आहे. यामुळे ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना सांगितले जाते. येथील एका खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
एका साधिकेला ती कोरोनाच्या संसर्गामुळे भरती झालेल्या कोविड रुग्णालयातील लक्षात आलेली विदारक स्थिती !
१. पहाटे ४ वाजता भरती झाल्यावर सकाळचा अल्पाहार १०.३० वाजता मिळाला.
२. दुपारचे जेवण ४ वाजता मिळाले. ३ वाजेपर्यंत जेवण आले नाही; म्हणून आधीच्या रुग्णाकडे चौकशी केल्यावर समजले की, जेवण वेळेवर मिळत नाही.
३. जेवण थंडगार असते.
४. सोलर सिस्टीम आहे; पण अंघोळीसाठी थंड पाणी मिळते. सर्वांना पिण्यासाठी गरम पाणी मिळावे; म्हणून वॉर्डमध्ये एक विजेवर चालणारी किटली आहे. काही महिला या किटलीमध्ये थोडे थोडे पाणी तापवून ते अंघोळीसाठी वापरतात.
५. धुतलेले कपडे वाळवायची व्यवस्था नाही. एके दिवशी एक कपडे सुकवायचा स्टँड आणला गेला. आता त्यावर सर्व महिला रुग्ण कपडे वाळत घालतात; पण आरोग्याच्या दृष्टीकोनातून हे किती हानिकारक आहे. काही महिला तर प्रसाधनगृहातील टॉवेल अडकवायच्या दांडीवरच कपडे वाळत घालतात.
हे सर्व भयानक आहे.
– एक साधिका
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org |