शहरांतर्गत सर्व कोरोना केंद्र आणि खासगी रुग्णालयात स्थानिकांना जागा राखीव ठेवा ! – शिवसेना शुक्रवार पेठ-उत्तरेश्वर पेठची महापालिका आयुक्तांच्या कडे मागणी
कोल्हापूर – कोरोनाच्या दुसर्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या पाहिली, तर जिल्ह्याबाहेरील उपचार घेणार्यांच्या रुग्णांची संख्या लक्षणीय असून व्हेंटिलेटर बेडवर परराज्यातील रुग्ण उपचार घेत आहेत. तरी याची नोंद घेऊन शहरांतर्गत सर्व कोरोना केंद्र आणि खासगी रुग्णालयात स्थानिकांना जागा राखीव ठेवावी, या मागणीचे निवेदन शिवसेना शुक्रवार पेठ-उत्तरेश्वर पेठच्या वतीने श्री. किशोर घाटगे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिले. यावर आयुक्तांनी स्थानिक कोरोना रुग्णांना प्राधान्याने उपचार देण्याच्या सूचना प्रशासनास देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात रुग्ण संख्या वाढत असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी विभागीय दुधाळी, फुलेवाडी, गांधी मैदान, राजेपाध्येनगर, कसबा बावडा, त्या सर्व विभागात ऑक्सिजन खाटा असलेली, प्रशिक्षित आधुनिक वैद्य असलेली अत्याधुनिक कोरोना केंद्रे त्वरित चालू करावीत. या वेळी सुरेश कदम, सनी अतिग्रे, राकेश पोवार, अनंत पाटील उपस्थित होते.