महाराष्ट्रात १ मेपासून रेशन दुकाने बंद ठेवण्याची चेतावणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेशन दुकानदारही सहभागी होणार
सिंधुदुर्ग – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिकाधारकाचा (रेशनकार्डधारकांचा) अंगठ्याचा ठसा न घेता धान्य वितरणास अनुमती द्यावी अन्यथा १ मेपासून धान्य वितरण बंद करण्यात येईल, अशी चेतावणी अखिल महाराष्ट्र राज्य रास्त दर धान्य दुकानदार आणि केरोसीन (रॉकेल) परवानाधारक संघटनेने दिली आहे. या बंदमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदार सहभागी होणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा रास्त दर धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूपेश पेडणेकर यांनी दिली.
कोरोना महामारीच्या काळात अनेक रेशन दुकानदारांचा मृत्यू झाला आहे. शिधापत्रिकाधारकाच्या अंगठ्याचा ठसा ‘इ पॉस’ यंत्रावर घेतल्यानंतर दुकानदारालाही त्याच्या अंगठ्याचा ठसा यंत्रावर द्यावा लागतो. त्यामुळे दुकानदारांचा अनेकांशी संपर्क येतो. अनेकांशी संपर्क आल्याने दुकानदारालाही कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नाही. यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या अंगठ्याचा ठसा न घेता केवळ दुकानदाराचा अंगठा प्रमाणित करून धान्य वितरित करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी रेशन दुकानदारांनी केली आहे. याविषयी राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे; मात्र अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे केवळ दुकानदाराच्या अंगठ्याचा ठसा घेऊन धान्य वितरित करण्याची अनुमती द्यावी अन्यथा १ मेपासून दुकान बंद ठेवून ‘इ-पॉस’ यंत्र तहसीलदार कार्यालयात जमा करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.