राज्यात लागू करण्यात आलेली ही दळणवळण बंदी नव्हे, तर केवळ निर्बंध असून आदेश नव्याने काढणे आवश्यक ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री
पणजी, २९ एप्रिल (वार्ता.) – राज्यशासनाने २९ एप्रिलच्या रात्री ९ वाजल्यापासून राज्यात दळणवळण बंदी लागू केलेली असली, तरी या आदेशावरून शासनातील मंत्री मायकल लोबो यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जिल्हाधिकार्यांनी प्रसिद्ध केलेला दळणवळण बंदी आदेश स्पष्ट नाही आणि याविषयी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे अन् उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. शासनाने प्रसिद्ध केलेल्या दळणवळण बंदी आदेशात पालट करून तो पुन्हा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे, असे मत बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केेले आहे.
मंत्री मायकल लोबो पुढे म्हणाले, ‘‘जिल्हाधिकार्यांनी प्रसिद्ध केलेल्या दळणवळण बंदी आदेशात सुस्पष्टता नाही. हा आदेश दळणवळण बंदीचा नाही, तर हा आदेश केवळ निर्बंध घालणारा आहे. दुकाने आणि आस्थापने चालू असतांना त्याला दळणवळण बंदी असे आम्ही कसे म्हणू? आदेशात पालट करून तो नव्याने प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.’’ दळणवळण बंदी आदेशाच्या उद्देशावरून सर्वसामान्य नागरिकांसमोरही प्रश्नचिन्ह !
राज्यशासनाने दळणवळण बंदी आदेशात केवळ ठराविक गोष्टींवरच निर्बंध घातले आहेत; मात्र इतर सर्व गोष्टी चालूच रहाणार असल्याने दळणवळण बंदी आदेशाच्या पूर्ण उद्देशावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या आदेशानुसार कॅसिनो, मद्यालये, क्रीडा संकुल, सभागृहे, रिव्हर क्रूझ, वॉटर पार्क, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, जिम्स, स्पा, मसाज पार्लर, केशकर्तनालये, चित्रपटगृहे, एन्टरटेनमेंट झोन, मॉल, साप्ताहिक बाजार, आदी बंद असतील. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद असणार आहेत; मात्र महाविद्यालयाच्या ऑनलाईन परीक्षा चालू असतील,
५० लोकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ, तर २० जणांच्या उपस्थितीत अत्यंविधी करता येणार आहे. कदंब बससेवा निम्म्या क्षमतेने कार्यरत रहाणार आहे. रेस्टॉरंट सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत निम्म्या क्षमतेने चालू रहाणार आहेत, तर रेस्टॉरंटाच्या स्वयंपाकघराला वेळेचे बंधन नाही. पालिका आणि पंचायत क्षेत्रांतील मासळी मार्केट आणि अन्य बाजार सामाजिक अंतर पाळून चालू ठेवता येणार आहेत, तसेच सर्व तर्हेची दुकाने सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालू असणार आहे. उद्योग, अन्य अत्यावश्यक सेवा, बांधकामे, औषधालये, प्रसारमाध्यमे, अधिकोष (बँका), पेट्रोल पंप, घरगुती गॅस पुरवठा सेवा, विमा सेवा देणारी आस्थापने चालू असतील. एवढे सर्व चालू रहाणार, तर सरकारने घोषित केलेली सध्याची दळणवळण बंदी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अपयशी ठरणार असल्याची प्रतिक्रिया गोवा फॉरवर्ड आदी विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे.