रेमडेसिविर इंजेक्शन चोरणार्या अफरोज खान याने मृताचे ३६ सहस्र रुपये लाटल्याचा पोलिसांना संशय !
जालना येथील मृत कचरू पिंपराळे यांच्याकडील, तसेच भ्रमणभाषच्या माध्यमातून रक्कम हडपल्याचे प्रकरण
संभाजीनगर – जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून रेमडेसिविर चोरून विकणार्या ७ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने २७ एप्रिल या दिवशी अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अफरोज इक्बाल खान (वय २२ वर्षे) हा जालना पोलिसांनाही चोरीच्या गुन्ह्यात हवा आहे. त्याने मृत रुग्णाचे ३६ सहस्र रुपये चोरल्याचा संशय असून या प्रकरणात पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
१५ एप्रिल या दिवशी जालना येथील जिल्हा रुग्णालयात कचरू मानसिंग पिंपराळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्याजवळील ३६ सहस्र रुपये, कागदपत्रे, अंगठ्या, भ्रमणभाष चोरीला गेल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले होते. पिंपराळे यांचा मृत्यू झाला तेव्हा अफरोज तिथे कामाला होता. ‘या चोरीत त्याचा हात असावा’, असा संशय कदीम ठाण्यातील पोलिसांना आहे. पिंपराळे यांच्या मृतदेहाचे फिंगरप्रिंटद्वारे भ्रमणभाष चालू करून ‘फोन पे’ अॅपवरून ६ सहस्र ८०० रुपये खात्यातून काढून घेण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी मोमीन मोहसीन मोमीन नसीर (रा. जालना) याला अटक केली आहे.
सायबर पोलीस त्याचे अन्वेषण करत आहेत. रेमडेसिविर प्रकरणात पकडलेले जालना येथील ४ जण मोमीनसमवेतच काम करतात, अशी पोलिसांना माहिती मिळाली. त्यामुळे कदीम पोलिसांनी अफरोज याची चौकशी करण्यासाठी येथील पोलिसांशी संपर्क साधला. जालना शासकीय रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन चोरीला गेल्याची माहिती तेथील रुग्णालय प्रशासनाला २८ एप्रिल या दिवशी वर्तमानपत्रातून समजली. येथील घाटी शासकीय रुग्णालयातूनही इंजेक्शन चोरीला गेली. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपींनी कारागृहातून सुटून पुन्हा हा गोरखधंदा चालू केल्याची चर्चा आहे.