परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रथम भेटीतच पूर्णवेळ साधना करण्याचा दृढ निश्चय करणारे आणि सतत आनंदी राहून झोकून देऊन सेवा करणारे रामनाथी आश्रमातील श्री. भूषण कुलकर्णी !
चैत्र कृष्ण पक्ष पंचमी (१.५.२०२१) या दिवशी रामनाथी येथील सनातन आश्रमात सेवा करणारे श्री. भूषण कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीने वर्णन केलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. भूषण कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. बालपण आणि शिक्षण
१ अ. यजमानांचा जन्म नवस केल्याने होणे आणि घरची आर्थिक परिस्थिती बेताची असणे : ‘माझे यजमान श्री. भूषण यांचा जन्म त्यांच्या आई-वडिलांनी श्री गुरुदेव दत्ताला नवस केल्यानंतर झाला. त्यांचे मोठे बंधू आणि ते यांच्यात १० वर्षांचे अंतर आहे. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. काही वेळा रात्री जेवणाच्या वेळी केवळ पाणी आणि पोळी खाऊन झोपणे किंवा पोहे, उपमा आदी खाऊन झोपणे, असे त्यांना करावे लागायचे.
१ आ. पालकांनी भरपूर कष्ट करून मुलांवर चांगले संस्कार करणे : श्री. भूषण यांची आई आणि आजोबा यांनी त्यांना देव अन् संत यांच्या गोष्टी सांगितल्या, तसेच विविध स्तोत्रेही म्हणवून घेतली. आर्थिक परिस्थिती बेताची असली, तरी आई-वडिलांनी मुलांना वाढवण्यासाठी भरपूर कष्ट घेतले.
१ इ. लहानपणापासून यजमानांनी घरची सर्व कामे करून आईला साहाय्य करणे : श्री. भूषण यांच्या आई इतरांकडे घरकामाला जायच्या. आईने त्यांना घरातील सर्व कामे शिकवून ठेवली होती. आई कामाला गेल्यावर वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांना स्वयंपाक करणे, ओटा आवरणे, केर काढणे, कपडे धुणे, तसेच भांडी घासणे, अशी कामे करावी लागली. त्यांनी आईला शेवया, चकली, कुरड्या इत्यादी बनवण्यासाठी साहाय्य केले.
१ ई. पौरोहित्य आणि नोकरी करून शिक्षण पूर्ण करणे : इयत्ता ८ वीपासून पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांनी सत्यनारायण पूजा करणे, श्री गणेशचतुर्थीच्या काळात गणेशपूजा सांगणे इत्यादी पौरोहित्याची कामे करून पैसे जमवले. त्यांनी ११ वी ते बी.कॉम्. पर्यंतचे शिक्षण नोकरी आणि अन्य कामे करत पूर्ण केले. त्यांनी सायकलवरून १५ ते २० किलोमीटर लांब जाऊन ‘पार्सल’ देण्यापासून ते ‘कॅशियर’पर्यंतच्या नोकऱ्या केल्या.
१ उ. महाविद्यालयात ‘गुणवंत विद्यार्थी’ म्हणून प्रशस्तीपत्रक मिळणे : शाळा आणि महाविद्यालय येथील त्यांची वागणूक शांत होती. त्यांचे अभ्यासातील आणि अन्य गुण पाहून ते १२ वीत असतांना त्यांना ‘गुणवंत विद्यार्थी’ असे प्रशस्तीपत्रक मिळाले.
१ ऊ. देवाची ओढ : त्यांना लहानपणापासून देवाची ओढ असल्याने ते घराजवळ असलेल्या दत्त मंदिरात प्रतिदिन आरतीसाठी जायचे आणि मंदिराची स्वच्छता अन् अन्य सेवा करायचे.
१ ए. प्रसंगी अर्धपोटी राहून काम करणे : बाहेर फिरतीची कामे करत असतांना ते क्वचितच न्याहरी करायचे. भूक लागली आणि डबा नसल्यास ते चहा अन् बिस्किट खाऊन भूक भागवायचे. त्यांना वर्षाला नवीन कपडे घेणे शक्य नसल्याने ते वर्षानुवर्षे मोजके कपडे वापरायचे. आजही ते कपडे जपून वापरतात.
२. सनातन संस्थेशी संपर्क
२ अ. सत्संग आणि सेवा यांना आरंभ करणे : मे १९९७ मध्ये ते सनातन संस्थेच्या साप्ताहिक सत्संगाला जाऊ लागले. सप्टेंबर १९९७ मध्ये आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांचे साधकांसाठी मार्गदर्शन झाले. ते ऐकून त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी सर्वस्व अर्पण करायचे ठरवले. त्यानंतर त्यांनी सेवा करायला आरंभ केला.
२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांची झालेली पहिली भेट आणि त्यांच्या आशीर्वादाने पूर्णवेळ साधक होण्याचा झालेला दृढ निश्चय! : नोव्हेंबर १९९७ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर पुणे येथे आले असतांना श्री. भूषण यांनी त्यांच्या चरणी नमस्कार केल्यावर त्यांना आज्ञाचक्राच्या ठिकाणी लख्ख प्रकाश जाणवला. त्यांचा कुलदेवतेचा नामजप चालू झाला आणि ‘शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।’, अशी समर्थांची वचने मनात उमटली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘साधनेत आणखी सक्रीय होऊन अध्यात्मात पुढे जा आणि भारतभर ईश्वरी राज्य आणूया.’’ यानंतर त्यांची सक्रीयता वाढली आणि हळूहळू घर अन् नोकरी यांविषयीचे विचार न्यून होत गेले. त्यांनी पूर्णवेळ साधक होण्याचा दृढ निश्चय केला.
२ इ. एक प्रसारसेवक घरी येणार असल्याने मालकांकडे १ घंटा उशिरा येण्याची अनुमती मागणे आणि ती नाकारल्याने नोकरी सोडून देणे : एक दिवस संस्थेचे तत्कालीन प्रसारसेवक घरी येणार होते. त्यामुळे यजमानांनी मालकांकडे १ घंटा कामावर उशिरा येण्याची अनुमती मागितली; पण मालकांनी ती नाकारली. तेव्हा त्यांनी नोकरीचे त्यागपत्र दिले. प्रत्यक्षात त्या प्रसारसेवकांचे घरी येणे रहित झाले, तरी भूषण यांना त्याचे वाईट वाटले नाही.
३. पूर्णवेळ साधना करण्यापूर्वी केलेल्या सेवा
३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांना संगणकीय धारिका दाखवण्याची सेवा मिळणे : वर्ष १९९७ पासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या जाहीर सभा चालू झाल्या. त्या वेळी त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत बसून त्यांना सभेच्या संदर्भातील संगणकीय धारिका दाखवण्याची सेवा मिळाली. त्या वेळी त्यांना अनेक अनुभूती आल्या.
३ आ. नोकरी करतांना तेथील भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने मालकांनी यजमानांचे कौतुक करणे आणि त्यांना वेतनवाढ देणे : श्री. भूषण यांनी पेट्रोलपंप, तसेच गाडीच्या ‘शोरूम’मध्येही काम केले. तेथे त्यांचे वागणे-बोलणे, तोंडवळा आणि कामाची पद्धत पाहून अनेक जण त्यांना ‘तुम्ही सनातनचे साधक आहात का ?’, असे विचारायचे. श्री. भूषण यांना तेथे ‘काही गोष्टींमध्ये घोटाळा होत आहे’, असे जाणवत होते. कामावर नवीनच असूनही त्यांनी मुख्य लेखापाल आणि आस्थापनाचे मालक यांना भेटून ‘कशा प्रकारे घोटाळा होत आहे’, हे सप्रमाण दाखवून दिले. त्यामुळे प्रतिमास होत असलेला २५ सहस्र रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. मालकांनी श्री. भूषण यांचे कौतुक केले आणि ते कायमस्वरूपी (परमनंन्ट) नसतांना त्यांना २ सहस्र रुपयांची वेतनवाढ केली.
३ इ. नोकरी करतांना झोकून देऊन दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्तांशी संबंधित सेवा करणे
१. यजमान सकाळी १० वाजता कामावर जायचे. त्यापूर्वी ते सकाळी ६ ते ८ या वेळेत दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्तांशी संबंधित सेवा करायचे.
२. ते दुपारी दूरभाषवर वृत्ते घेणे, अन्य वृत्ते करून पाठवणे, वेळप्रसंगी न्यायालयात जाऊन वृत्ते घेणे आदी सेवा करायचे.
३. काही वेळा संस्था किंवा समिती यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मोहिमांविषयीची वृत्ते संकलित करायला जाण्याविषयी त्यांना अकस्मात् कळायचे. त्या वेळी ते कुठलाही विचार न करता बिनपगारी सुटी घेऊन जायचे.
४. काही वेळा ते रात्री प्रवास करून सकाळी हिंदु धर्मजागृती सभा किंवा धर्मजागृतीविषयीची मोहीम यांविषयी वृत्त बनवण्यासाठी त्या स्थळी पोचायचे. तिथे दिवसभर सेवा करून आणि रात्री उशिरापर्यंत थांबून ते वृत्ताशी संबंधित सेवा पूर्ण करायचे. ही सेवा झाल्यावर रात्री जी बस मिळेल, त्या बसने ते सकाळी पुण्यात पोचायचे आणि लगोलग कामाला जायचे. तेथील सर्व कामे पूर्ण करून ते पुन्हा वृत्तांशी संबंधित सेवा करायचे.
४. पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ
४ अ. विविध प्रकारच्या सेवा करणे : त्यांनी पूर्णवेळ साधना चालू केल्यावर ते आणि अन्य एक साधक एका लहान खोलीत रहात होते. ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, मुंबई आणि गोवा येथून येणारे ग्रंथ, फलक (बॅनर) यांचे ‘पार्सल’ घेणे अन् ते अन्य जिल्ह्यांना पाठवणे, वार्ताहर म्हणून सेवा करणे, दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संरचनेची सेवा करणे, सत्संग घेणे, अशा विविध प्रकारच्या सेवा करत असत.
४ आ. पायावरून रिक्शा गेल्याने पायाचा अस्थिभंग (फ्रॅक्चर) होणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे पाय लवकर बरा होणे : एकदा त्यांच्या पायावरून रिक्शा गेली. तेव्हा ते एकटेच होते आणि संपर्कासाठी जवळ भ्रमणभाषही नव्हता. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण काढून अशा स्थितीतच ते सेवाकेंद्रात पोचले. नंतर साधकांनी त्यांना रुग्णालयात नेऊन अस्थिभंग झालेल्या उजव्या पायाला ‘प्लास्टर’ घातले. त्या वेळी आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘हाडाला शेवटपर्यंत ‘क्रॅक’ गेला आहे. तो १५ दिवसांत भरून आला नाही, तर शस्त्रकर्म करावे लागेल. तू पूर्णवेळ देवाचे कार्य करत आहेस, तर देव तुला साहाय्य करील.’’ त्यानंतर १५ दिवसांनी त्यांच्या पायाची क्ष-किरण तपासणी केल्यावर ‘क्रॅक’ अर्ध्याहून अधिक भरल्याचे आढळले. त्या वेळी ते आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘देवाची तुझ्यावर फार कृपा आहे.’’ ‘अशा प्रकारच्या अपघातातून येणारे अपंगत्व किंवा मृत्यू केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे टळला’, असा यजमानांचा भाव आहे. अस्थिभंग झालेल्या स्थितीत यजमानांनी बसून सेवाही केल्या.
४ इ. फोंडा, गोवा येथे आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व सेवा शिकून घेण्यास सांगणे : जानेवारी २००१ मध्ये श्री. भूषण फोंडा, गोवा येथे सेवेला आले. १ मासाने त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात एका छोट्या प्रवाहात राहून सेवा करत होतास. सेवाकेंद्र म्हणजे अथांग समुद्र आहे. या समुद्रात राहून सर्व शिकून घे आणि साधना कर.’’ याच कालावधीत श्री. भूषण यांना श्री गणेशाकडून सूक्ष्मातून ज्ञान मिळत होते. त्यांना पौराहित्याची सेवा शिकून ध्यानमंदिरात पूजा करणे, यज्ञ, अनुष्ठान करणे आणि त्यातून भावभक्ती वाढवण्यास सांगितले होते.
४ ई. उत्साहाने आणि चिकाटीने सेवा करणे : त्यांना शारीरिक त्रास असूनही ते सेवेत कधीही सवलत घेत नाहीत. आता रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करत असतांना ते आश्रम स्वच्छता, दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा, संतांचे कपडे धुणे आदी सेवा सहजतेने करतात. त्यांना कोणतीही सेवा सांगितली आणि ती पूर्ण करण्यासाठी कितीही कालावधी लागला, तरी ते चिकाटीने प्रयत्न करतात.
५. अन्य वैशिष्ट्ये
५ अ. आई-वडील रुग्णाईत असतांना ‘एक साधक’ म्हणून त्यांची सेवा करणे : आई-वडील रुग्णाईत असतांना यजमानांनी ‘एक साधक’ म्हणून त्यांची सेवा केली. त्यांनी त्या दोघांना कशातही न अडकता नामजप करायला सांगितला. ते म्हणायचे, ‘‘तुम्ही काळजी करू नका. परात्पर गुरु डॉक्टर तुम्हाला कशातही अडकू देणार नाहीत. ते तुम्हाला चांगली गती देतील.’’
५ आ. पत्नीला समजून घेऊन तिच्यासाठी नामजपादी आध्यात्मिक उपाय करणे : मला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे माझी चिडचिड होत असते, तरी ते माझ्यावर कधीही चिडत नाहीत. ते मला समजून घेऊन योग्य दृष्टीकोन देतात. ते माझ्यासाठी नामजपादी आध्यात्मिक उपाय करतात. ते मला मानसिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही स्तरांवर हाताळतात.
५ इ. सकारात्मक आणि आनंदी असणे : त्यांना घर, कपडे, खाणे-पिणे, पैसा आदी गोष्टींची ओढ नाही. त्यांच्या ताटात जे अन्न येईल, ते ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करतात आणि ते अन्न कधीही वाया घालवत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत रहाण्याची त्यांची सिद्धता असते. ‘सर्वकाही देवाच्या कृपेने मिळाले आहे’, असा त्यांचा भाव असतो.
५ ई. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अनन्य श्रद्धा : आमची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. एखादा व्यय अकस्मात् उद्भवला, तर ते मला नेहमी सांगतात, ‘‘काळजी करू नको. देवाच्या, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने पैशांची व्यवस्था होईल.’’ ते स्वतःला परात्पर गुरु डॉक्टरांच्या दारातील ‘एक दास’, असे समजतात. ‘देवच काळजी घेतो’, असा त्यांचा भाव आहे.’
– सौ. मैत्रेयी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.३.२०२१)