चैत्र मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !
‘१३.४.२०२१ या दिवसापासून चैत्र मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत. २.५.२०२१ ते ८.५.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, वसंतऋतू, चैत्र मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. २७.४.२०२१ पासून कृष्ण पक्ष चालू झाला आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्याला विलंब होण्याचा संभव असतो. २.५.२०२१ या दिवशी दुपारी २.५१ पासून उत्तररात्री २.१० पर्यंत आणि ५.५.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.४२ पासून ६.५.२०२१ या दिवशी दुपारी २.११ पर्यंत विष्टी करण आहे.
२आ. कालाष्टमी : प्रत्येक मासातील प्रदोषकाळी असलेल्या कृष्ण अष्टमीला ‘कालाष्टमी’ म्हणतात. कालाष्टमीच्या दिवशी शिवोपासना करतात. या दिवशी शिवाच्या भैरव स्वरूपाची उपासना करतात. ३.५.२०२१ या दिवशी दुपारी १.४० पासून अष्टमी तिथी चालू होते.
२ इ. अमृत योग : सोमवारी श्रवण नक्षत्र असल्यास ‘अमृत योग’ होतो. अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. ३.५.२०२१ या दिवशी हा योग सकाळी ८.२२ पासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत आहे.
२ ई. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ५.५.२०२१ या दिवशी दुपारी १.२२ पासून ६.५.२०२१ या दिवशी सकाळी १०.३२ पर्यंत आणि ७.५.२०२१ या दिवशी दुपारी १२.२६ पासून दुपारी ३.३३ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ उ. वरूथिनी एकादशी : चैत्र कृष्ण पक्ष एकादशीला ‘वरूथिनी एकादशी’ असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूच्या मधुसूदनरूपाची पूजा करतात. या दिवशी एकादशी महात्म्य, श्रीविष्णुसहस्र नामावली वाचावी. वरूथिनी एकादशीच्या व्रताने सर्व दुखांचा नाश होतो. शुक्रवार, ७.५.२०२१ या दिवशी वरूथिनी एकादशी आहे.
२ ऊ. श्रीवल्लभाचार्य जयंती : चैत्र कृष्ण पक्ष एकादशीला ‘श्रीवल्लभाचार्य जयंती’ साजरी करतात.
टीप १ – भद्रा (विष्टी करण), कालाष्टमी, घबाड मुहूर्त, अमृत योग आणि एकादशी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
टीप २ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥ – संत एकनाथ अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२१.४.२०२१)