१० वर्षे पोलीस पाटलांच्या प्रतीक्षेत रेठरे बुद्रुक (सातारा) ग्रामस्थ !
सातारा, २९ एप्रिल (वार्ता.) – कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावाला गत १० वर्षांपासून पोलीस पाटील नसल्याने सर्वच संबंधित कामे तलाठी यांना करावी लागत आहेत. रेठरे बुद्रुक हे गाव राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानले जाते. १८ सहस्रांहून अधिक लोकसंख्या असलेले हे गाव पोलीस पाटील नसल्यामुळे खोळंबले आहे. ग्रामस्थांना विविध दाखल्यांसाठी तलाठ्याकडे हेलपाटे घालावे लागत आहेत. मध्यंतरी शासनाने रिक्त जागेवर बंजारा जातीसाठी जागा भरण्याचा आदेश काढला होता; मात्र त्या प्रवर्गातील व्यक्ती गावात नसल्याने हे पद रिक्त राहिले. रिक्त पदावर जिल्हाधिकार्यांनी त्यांच्या अधिकारात नवी नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे. (गेल्या १० वर्षांत एका गावात तलाठ्यांची नेमणूक न होणे अत्यंत गंभीर आहे. ग्रामस्थांनी पुढे जाऊन ही समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा घ्यावा. – संपादक)