सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या महत्त्वपूर्ण घडामोडी
आमदार दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी आमदार निधी
ओरोस – जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांनी प्रत्येकी ५०० अशा एकूण १ सहस्र रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी स्वत:च्या आमदार निधीतून निधी दिला आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे हा निधी सुपुर्द करण्यात आला आहे. लवकरच या निधीतून १ सहस्र रेमडेसिवीर इंजेक्शने उपलब्ध करण्यात येणार आहेत.
कोरोनाविषयीचे प्रलंबित अहवाल ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना
सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कोरोनाविषयीचे (कोविड टेस्टचे) काही प्रलंबित अहवाल ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावेत, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. याविषयी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या समवेत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या वेळी या सूचना देण्यात आल्या. या वेळी जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या उपाययोजनांविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, तसेच कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटर यांचा आढावा घेण्यात आला.
मालवण येथे पत्रकाराने मुलीच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे केले आयोजन
मालवण – संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या विरोधात लढत आहे़. रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची हीच आवश्यकता ओळखून येथील महिला पोलीस कर्मचारी सौ. स्वाती आचरेकर आणि पत्रकार सिद्धेश आचरेकर यांनी त्यांची कन्या ज्ञानदा हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जोपासत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे समाजातून कौतुक करण्यात येत आहे.
बारा बलुतेदारांना स्वतंत्र आर्थिक साहाय्य देण्याची मागणी
कुडाळ – दळणवळण बंदीमुळे बारा बलुतेदारांवर कोरोनाच्या काळात त्यांचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना स्वतंत्र आर्थिक साहाय्य (आर्थिक पॅकेज) घोषित करावे, अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत्दाहिनी उपलब्ध करून देण्याची मागणी
ओरोस – सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांवर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी काही ठिकाणी विरोध केला जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग ओढवत आहेत. याची तात्काळ नोंद घेऊन जिल्हा प्राधिकरण क्षेत्रात आणि नगरपालिका क्षेत्रात अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत्दाहिनी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
कणकवली शहरात १ मेपासून १० दिवस जनता कर्फ्यू
कणकवली – शहरात १ ते १० मे या कालावधीत ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात येणार आहे. या कालावधीत औषधांची दुकाने आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने, आस्थापने, कार्यालये यांसह मंगल कार्यालये देखील बंद ठेवली जाणार आहेत. सर्व पक्षांचे प्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली शहरासह तालुक्यात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.