गोव्यात दिवसभरात ८ सहस्र १८ चाचण्यांत ३ सहस्र १०१ कोरोनाबाधित आढळले
पणजी – राज्यात २८ एप्रिल या दिवशी कोरोनाबाधित नवीन रुग्णसंख्येने पुन्हा नवीन उच्चांक स्थापित केला आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाविषयक ८ सहस्र १८ चाचण्या करण्यात आल्या. यांमध्ये ३ सहस्र १०१ कोरोनाबाधित आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण ३८.६७५ टक्के आहे. दिवसभरात २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यांपैकी १३ जणांचा मृत्यू २४ घंट्यांच्या आत झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या १ सहस्र ११० झाली आहे. दिवसभरात ८३९ रुग्ण बरे झाले. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेणार्या कोरोनाबाधितांची संख्या सध्या १८ सहस्र ८२९ झाली आहे.
अधिक संख्येने कोरोनाबाधित रुग्ण असलेली आरोग्य केंद्रे
राज्यात मडगाव येथे १ सहस्र ८२८, कांदोळी १ सहस्र ४३६, पर्वरी १ सहस्र २९१, कुठ्ठाळी १ सहस्र १९२, पणजी १ सहस्र १६२ आणि फोंडा १ सहस्र ९१ या आरोग्य केंद्रांत १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. म्हापसा ९३७, वास्को ७८४, डिचोली ७०९, कासावली ६९४, चिंबल ६८८, सांखळी ६३५ आणि शिवोली ६०० ही आरोग्यकेंद्रे त्या खालोखाल रुग्ण असलेली आहेत.
कळंगुट, कांदोळी, हडफडे आणि नागोआ हे भाग १० दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र करणार
पणजी – २८ एप्रिलपासून पुढील १० दिवस कळंगुट, कांदोळी, हडफडे आणि नागोआ ही ठिकाणे प्रतिबंधित विभाग म्हणून घोषित केली जाणार असल्याची माहिती कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘या १० दिवसांत सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा चालू रहातील. त्यानंतर या भागांतील दुकाने आणि वाहतूक आदी गोष्टी बंद रहातील. नियम मोडणार्यांवर कडक कारवाई केली जाईल.’’