अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतील कर्मचार्‍याने मागितलेली लाच देण्यासाठी महिलेने काढले कर्ज !

मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या अशा कर्मचार्‍यांना फाशीची शिक्षा करा !

बेंगळुरू (कर्नाटक) – फेरीवाला म्हणून व्यवसाय करणार्‍या राधम्मा नावाच्या एका महिलेने व्याजासह कर्ज काढून रुग्णवाहिकेला ५ सहस्र आणि स्मशानातील कर्मचार्‍याला ३ सहस्र देऊन तिच्या मृत कोरोनाबाधिता नातेवाइकावर अंत्यसंस्कार केल्याची घटना यलहंका येथे घडली. शव रुग्णवाहिकेतून यलहंका मेडी येथील स्मशानभूमीत आणण्यात आल्यावर तेथल्या कर्मचार्‍याने ‘पैसे दिले तरच अंत्यसंस्कार करण्यात येईल’, असे सांगितले. रुग्णवाहिकेच्या चालकानेही अधिक पैशाची मागणी केली. राधम्माने हात जोडून विनंती केली; मात्र त्यांनी ते ऐकले नाही. त्यामुळे राधम्माने माइक्रो फाइनान्स आस्थापनातून व्याजाने कर्ज काढून पैसे दिले.

स्मशानभूमीतील कर्मचार्‍याने पैसे घेतल्याची ही घटना प्रजा परिवर्तन वेदिकेच्या सदस्यांना समजताच त्या स्थळी त्यांनी काही काळ आंदोलन करून निषेध केला. स्मशान कर्मचारी आणि वेदिका सदस्यांमध्ये या वेळी वादावादी झाली. गरिबांना लुबाडणार्‍या स्मशानभूमी कर्मचार्‍यांची ही लूट थांबवण्यासाठी पालिका अधिकार्‍यांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.