२५ सहस्र मेट्रिक टन ‘लिक्विड ऑक्सिजन’ आणि १० लाख ‘रेमडेसिविर’ यांसाठी राज्यशासनाकडून जागतिक निविदा ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
दीड कोटी लसीकरण पूर्ण, नियमित ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट
मुंबई – ऑक्सिजन आणि ‘रेमडेसिविर’ यांच्या उपलब्धतेसाठी राज्यशासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्याद्वारे ४० सहस्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १३२ पी.एस्.ए., २७ ऑक्सिजन टँक, २५ सहस्र मेट्रीक टन ‘लिक्विड ऑक्सिजन’ आणि १० लाख ‘व्हायल्स रेमडीसिविर’ यांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. २७ एप्रिल या दिवशी राज्यात दीड कोटी लसीकरण पूर्ण झाले. आता नियमित ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी केंद्रशासनाकडे लसीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
राजेश टोपे म्हणाले, ‘‘लसीकरणासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी ‘कोविन अॅप’वर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार लसीकरणाची वेळ निश्चित केली जाणार आहे. राज्यात सध्या १ सहस्र ६१५ मेट्रीक टन ऑक्सिजन वापरला जातो. त्याचा काटकसरीने वापर व्हावा, यासाठी प्रमाणित कार्यपद्धती सिद्ध करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात ‘ऑक्सिजन नर्स’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे. ५० रुग्णांसाठी एक परिचारिका नियुक्त करून त्यांच्या माध्यमातून ऑक्सिजनच्या वापरावर लक्ष ठेवले जाते. ही संकल्पना यशस्वी झाल्याचे दिसत आहे. असा प्रयोग अन्य ठिकाणीही वापरावा.’’