मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्री लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू !
ठाणे, २८ एप्रिल (वार्ता.) – मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर २७ एप्रिलच्या मध्यरात्री ३ वाजून ४० मिनिटांनी भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्नीशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणली. आगीच्या घटनेच्या वेळी रुग्णालयात २० रुग्ण भरती होते, त्यांपैकी ६ जण अतिदक्षता विभागात होते. या ६ रुग्णांना जवळच्या बिलाल रुग्णालयात हालवण्यात आले आहे, तर इतर रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. या आगीमध्ये होरपळून कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नसून रुग्णांना रुग्णालयामधून अन्य रुग्णालयात भरती करतांना ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे सांगण्यात येत आहे.
मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ठाणे महानगरपालिकेकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य ! – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
ठाणे येथील सर्व रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट पूर्ण करण्याचे आयुक्तांना निर्देश
आगीच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंंबियांना मुख्यमंत्र्यांनी ५ लाख रुपयांचे आणि घायाळांना १ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे, तर नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देऊन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना अतिरिक्त ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे. तसेच रुग्णालयातील या आगीच्या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रत्येक रुग्णालयाचे अग्नीसुरक्षा, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट लवकरात लवकर करण्याचे निर्देश शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले आहेत.
शासनाच्या वतीने देण्यात येणार्या अनुमती रुग्णालयाकडे नव्हत्या !
आग लागल्याच्या घटनेनंतर आता अन्वेषण चालू झाले आहे. या रुग्णालयाकडे अग्नीसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र (एन्ओसी) नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयाला महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या माध्यमातून आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याची नोटीसही बजावली होती; परंतु त्या उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत, तसेच शासनाच्या वतीने देण्यात येणार्या अनुमती रुग्णालयाकडे नव्हत्या, अशी माहिती सूत्रांकडून समजते. अशा परिस्थितीत हे रुग्णालय चालू होते. (अशा प्रकारे रुग्णालये उभारणार्यांवर कठोर कारवाई होत नसल्याचाच हा परिणाम आहे. – संपादक)