विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर शहरातील २७७ रुग्णालयांना नोटिसा बजावल्या !

वसई-विरार महानगरपालिकेचे अग्नीसुरक्षा परीक्षणाकडे दुर्लक्ष !

लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या रुग्णालयांवर कठोर दंडात्मक कारवाई करायला हवी !

वसई-विरार महानगरपालिका

ठाणे, २८ एप्रिल (वार्ता.) – विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर शहरातील रुग्णालयांच्या अग्नीसुरक्षेच्या परीक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांनी अग्नीसुरक्षा परीक्षण केले नाही, हे आता उघड होत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात एकूण २७७ खासगी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांना अग्नीसुरक्षा परीक्षणाच्या नोटिसा बजावल्या आहेत.

प्रत्येकी ६ मासांनी अग्नीसुरक्षा परीक्षण करणे बंधनकारक असतांना अनेक रुग्णालयांनी हे नियम पाळलेले नाहीत. बरीच रुग्णालये निवासी इमारती गाळ्यांमध्ये उभारलेली आहेत. पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र घेतल्यानंतरही त्यांनी वाढीव आणि अवैध बांधकामे केली आहेत. महानगरपालिकेने रुग्णालयांनी ‘ऑडिट’ केले का, याची पडताळणे करणे आवश्यक आहे.