आता पुण्यात कोरोना रुग्णांचे होणार ‘ऑडिट’ !
पुणे महापालिकेचा नवा प्रयोग
पुणे, २८ एप्रिल – कोरोना रुग्णांची संख्या प्रतिदिन वाढत आहे. या स्थितीत अनेक रुग्णांना वेळेत बेड न मिळणे, उपचार न होणे यांमुळे मृत्यू होत आहेत. त्यामुळे आता रुग्णांचे ‘ऑडिट’ करण्याचा एक नवा प्रयोग महापालिकेने घेतला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली. या प्रयोगानुसार प्रतिदिन १०० ते १२५ खाटा उपलब्ध होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
आवश्यकता नसतांना १२ ते १५ दिवस उपचार घेणे, ठणठणीत बरे होऊनही भीतीपोटी खाट न सोडणे असे करणार्या रुग्णांचे समुपदेशन करत, खाटा मोकळ्या करण्याचा नवा प्रयोग महापालिका राबवत आहे. शहरात प्रतिदिन नव्याने १० ते १२ टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागते. त्यातील ५० टक्के रुग्णांना ऑक्सिजन, अतीदक्षता विभागातील उपचारांची आवश्यकता असते, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली.
या ‘ऑडिट’मध्ये रुग्ण भरती झाल्यापासून कोणते उपचार दिले ? त्याचा कालावधी, त्यानंतर रुग्णाची प्रकृती आणि आणखी उपचारांची आवश्यकता आहे का ? या गोष्टी पडताळल्या जाव्यात, अशा सूचना महापालिकेच्या आधुनिक वैद्यांना दिल्या आहेत. यापुढे खासगी रुग्णालयातही अशा स्वरूपाचे ‘ऑडिट’ होईल, असेही पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.