मुलांवर चांगले संस्कार करून पूर्ण वेळ साधना करण्यास प्रोत्साहन देणार्या आणि मुलांना मोक्षदायी गुरुचरणांशी पोचवणार्या श्रीमती संध्या बधाले !
रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या श्रीमती संध्या बधाले (आई) यांचा चैत्र कृष्ण पक्ष तृतीया २९.४.२०२१ या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त सनातनच्या रामनाथी आश्रमात पूर्ण वेळ साधना करणार्या त्यांच्या मुलांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्रीमती संध्या बधाले यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. सोनाली (मुलगी)
१ अ. जीवनात अनेक कठीण प्रसंगांना तोंड देऊन मुलांचा सांभाळ करणे : ‘माझी आई (आत्मस्वरूप) ईश्वराच्या, म्हणजे गुरुमाऊलींच्या चरणी आणून सोडणारी आहे. ‘आईच्या जीवनात आलेल्या अनेक कठीण प्रसंगांना ती कशी सामोरी गेली असेल ?’, ते तिला आणि भगवंतालाच ठाऊक ! त्या स्थितीतही स्थिर राहून तिने आमचा सांभाळ केला.
१ आ. आईला साधनेविषयी कळल्यावर त्यालाच प्राधान्य देणे आणि मुलांनाही व्यवहारापेक्षा साधना करण्यास शिकवणे : आईला साधना समजल्यावर तिने प्राधान्याने साधना करण्यास महत्त्व दिले. कोणताही व्यावहारिक अथवा इतर विचार न करता स्वतः साधना करायला आरंभ केला आणि आम्हालाही साधना शिकवली. तिने मुलांना शिक्षण देऊन व्यावहारिकदृष्ट्या सक्षम बनवले असते, तर आमची आर्थिक स्थिती पालटली असती; पण तिने तसा विचार कधीच केला नाही. तिने तिन्ही मुलांनाही पूर्ण वेळ साधना करायला शिकवले आणि ती स्वतःही पूर्ण वेळ साधना करू लागली. आम्ही साधना करून जे समाधान, आनंद, प्रेम आणि भगवंताप्रती भाव-भक्ती अनुभवत आहोत, ते कदाचित् आम्हाला व्यवहारात कधीच मिळाले नसते. आईने दूरदृष्टीने विचार केला; म्हणूनच आम्ही साधना करण्यासाठी आश्रमात आलो. ही आमच्यावर गुरूंची मोठी कृपा आहे.
१ इ. कष्टाळू वृत्ती : तिचे पूर्ण आयुष्य अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये गेले. विवाहानंतरचे जीवन कष्टमय होते. कितीही कष्ट केले, तरी तिला कधीच सुख लाभले नाही. शेतीतील कामाला जाणे, खाणकाम करण्यास जाणे, रस्ता बांधणीची (रस्त्यावरील) कामे करणे, भाजीपाला विकणे अशी अनेक प्रकारची कामे तिने केली आहेत.
१ ई. परिस्थिती मनापासून स्वीकारणे : वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाचे सर्व दायित्व आईवर आले. आर्थिक स्थिती बिकट असल्याने कुटुंब चालवतांना तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागायचे. त्या स्थितीतही आम्हा तिघांचे शिक्षण, घर चालवणे अन् इतर गोष्टी करतांना तिने कोणतीही तक्रार न करता केले. इतर मुलांना सर्वकाही मिळते; पण माझ्या मुलांना यातील काहीच मिळत नाही, याचे कधी कधी तिला पुष्कळ वाईट वाटत असे. अशा स्थितीतही तिने खचून न जाता ‘मुलांसाठी चांगले काय करू शकतो ?’, याचा विचार केला.
१ उ. साधनेचे महत्त्व मनावर बिंबवणे : आरंभी मला साधनेची आवड नव्हती आणि ‘अलिप्त रहाणे’, हा माझा स्वभावदोष असल्याने मला कुणाशी अधिक बोलायला जमत नव्हते. त्यामुळे तिने मला केंद्रातील साधकांच्या समवेत सेवेला पाठवले. मी ‘सेवा करायला नको’, असे म्हणत असतांनाही तिने माझ्याकडून सेवा करवून घेतली. यामुळे कधी कधी माझी पुष्कळ चिडचिड होत असे; पण आज साधनेत असल्यामुळे आणि आईने केलेल्या संस्कारामुळेच या सर्व गोष्टींचे महत्त्व माझ्या लक्षात येते.
१ ऊ. प्रसाराला गेल्यावर योग्य बोलायला शिकवणे : आई मला साधकांच्या समवेत प्रसार सेवेला पाठवत असे. मी घरी आल्यावर ‘तू सेवा करतांना काय बोललीस ?’, असे विचारून ती माझ्याकडून ‘योग्य कसे बोलावे ?’, याचा सराव करवून घेत असे.
१ ए. आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्यासाठी साहाय्य करणे : माझा ‘आश्रमात पूर्ण वेळ होऊन साधना करण्यापेक्षा घरी राहून जमेल तेवढी साधना करूया’, असा विचार होता. सुट्टीच्या दिवसांत मला रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाली. तेव्हा आईने मला ‘साधना करण्यासाठी तू आश्रमातच रहा’, असे सांगून मला पूर्ण वेळ साधना करण्यास पुष्कळ साहाय्य केले.
१ ऐ. ‘केवळ प.पू. बाबांचे चरण हवेत’, असा भाव असणे : प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या भंडार्यासाठी आई कांदळी येथे गेली होती. त्या वेळी सर्वजण प.पू. बाबांच्या भंडार्याला आलेल्या एका संतांना (फकिराला) नमस्कार करत होते. आई त्यांना नमस्कार करत असतांना त्यांनी तिला विचारले, ‘‘तुला काय हवे आहे ?’’ तेव्हा आई म्हणाली, ‘‘मला केवळ प.पू. बाबांचे चरण हवे आहेत.’’ ते म्हणाले, ‘‘तुला बाबांनी त्यांच्या चरणांजवळच ठेवले आहे.’’
२. श्री. अमोल आणि अतुल बधाले (मुलगे)
२ अ. स्वाभिमानी बनवणे : ‘घरची परिस्थिती बिकट असतांनाही तिने कधीच कुणापुढे हात पसरला नाही. ‘एक वेळ आपण उपाशी राहिलो, तरी चालेल; पण कुणाचे देणे नको’, असे ती नेहमी म्हणत असे. तिच्यामुळेच आम्हाला आहे त्या स्थितीत आनंदी अन् स्थिर रहाण्यास शिकता आले.
२ आ. कुणी कसेही वागले, तरी सर्वांशी चांगले वागणे : घरामध्ये कुणीही आले, तरी तिने आम्हाला त्यांच्याशी आदराने बोलायला शिकवले. जी व्यक्ती आमच्याशी वाईट वागली आहे आणि ती आमच्या घरी आली, तरी ती त्यांच्याशी चांगलेच वागायची. ती म्हणायची, ‘‘त्यांनी कसे वागायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी आपल्याला थोडे का होईना; पण साहाय्य केले आहे, तर आपण त्याची जाणीव ठेवून त्यांच्याशी नेहमीच चांगले वागले पाहिजे.’’
२ इ. घरातील कामे आणि व्यवहार शिकवणे : आईने आम्हा तिघा भावंडाना घरातील सर्व कामे करण्यास शिकवले. स्वयंपाक करणे, घरातील इतर कामे करणे, कपडे धुणे, खरेदी करणे यांसारख्या अनेक गोष्टी शिकवल्या.
२ ई. मुलांना साधनेसाठी प्रोत्साहन देणे : आईने नेहमी तिन्ही मुलांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आम्हाला साधना करण्यासाठी काहीच अल्प पडू दिले नाही. साधनेच्या दृष्टीने जे काही आवश्यक होते, ते सर्व तिने त्या त्या वेळी उपलब्ध करवून दिले. ‘सर्व मुलांनी साधना केली, तर समाज काय म्हणेल ?’, याचा तिने कधी विचार केला नाही. साधना हाच तिचा केंद्रबिंदू होता.
२ उ. साधनेची तीव्र तळमळ असणे : आईला शारीरिक आणि तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्याही स्थितीत ती तिची व्यष्टी साधना पूर्ण करते.
आज आईची तीव्र तळमळ आणि साधना यांमुळेच आम्ही सर्वजण एकत्र असून आनंदात आहोत. भगवंताने आम्हाला कोणत्याच गोष्टीची उणीव भासू दिली नाही आणि पुढेही कधीच भासू देणार नाही. ही आम्हा सर्वांची दृढ श्रद्धा आहे. आम्हा सर्वांनाच त्याने त्याच्या चरणाजवळ ठेवले आहे. केवढी ही भगवंताची कृपा !’
३. श्री. अमोल बधाले
३ अ. लहानपणी चांगले संस्कार करणे : पूर्वी मला साधनेची आवड नव्हती. त्यामुळे ती सांगत असलेले मला कधीच पटायचे नाही. माझ्याकडून तिला उलट बोलणे, तिचे न ऐकणे, तिने शिक्षा केली, तर तिच्याशी अबोला धरणे, असे होत असे, तरीही तिने माझ्यावर साधनेचे संस्कार करायचे कधीच सोडले नाही. आमच्या घराच्या समोरच खेळण्याचे मैदान होते. मी संध्याकाळी तिथे खेळायला जायचो. दिवे लागण्याची वेळ झाली की, ती नेहमी बोलावून घ्यायची आणि घरातील दिवा लावणे, केर काढणे, आरती करणे या सर्व गोष्टी करायला लावायची. या सर्व गोष्टींचा मला कंटाळा असल्यामुळे मी तिने बोलावल्यावर जायचो नाही. तेव्हा ती मला तिथे येऊन कधी मारून, तर कधी ओरडून घेऊन जायची आणि घरातील सर्व गोष्टी प्रतिदिन करून घ्यायची. त्या वेळी मला तिचा पुष्कळ राग यायचा; मात्र साधनेत आल्यानंतर तिने केलेल्या संस्कारांचे आणि आईचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
३ आ. आईने चांगले संस्कार केल्यामुळे मोक्षदायी गुरुचरणांकडे जाता येणे : आईने केलेल्या संस्कारामुळे इतर मुलांपेक्षा माझे भवितव्य निश्चितच चांगले घडले आहे. त्या वेळी तिने चांगले संस्कार केले नसते, तर मला मोक्षदायी गुरुचरणांशी वाट कधीच मिळाली नसती. माझी आई इतरांपेक्षा वेगळी होती; कारण तिला माझे संस्कारी व्यक्तीमत्त्व घडवायचे होते आणि ती त्यासाठी निरंतर, न खचता प्रयत्न करत राहिली.
३ इ. मुलांना हाक मारतांना नावाचा अपभ्रंश न करणे : पूर्वी शाळा आणि महाविद्यालय यांतील सर्वच मित्र आपल्या मित्रांच्या नावाचा अपभ्रंश (अयोग्य पद्धतीने) करायचे. ते मला भेटण्यासाठी घरी यायचे, त्या वेळी ते मला ‘अमोल’ न म्हणता ‘अमल्या’ अशी हाक मारायचे; पण हे आईला आवडायचे नाही. ती त्या मुलांना प्रत्येक वेळी सांगायची, ‘‘त्याला चांगले नाव दिले आहे ना ! त्याला त्याच नावाने हाक का मारत नाही ?’’ त्यामुळे माझे मित्र मला योग्य नावाने हाक मारू लागले. पुढे तिच्या या संस्कारामुळे मीही इतर मित्रांना योग्य नावाने हाक मारू लागलो. आईचा स्वभाव संस्कारयुक्त असल्यामुळे माझ्या मित्रांना माझ्या आईची आदरयुक्त भीती वाटायची.
३ ई. कोणत्याही गोष्टीची आवड-निवड निर्माण न होणे : आईमुळे जेवणाच्या संदर्भात माझी कोणतीही आवड-निवड निर्माण झाली नाही. ती जे काही करायची, ते तिने मला सर्व खायला शिकवले. त्यामुळे नकळतच आवड-निवडीविषयी माझा मनोलय झाला. ती जे कपडे आणायची तेच कपडे आम्ही घालत असू. तिने आम्हाला आवश्यक त्याच गोष्टी दिल्या. तिने आमचे अनावश्यक लाड कधीच पुरवले नाहीत.
३ उ. आईने साधना चालू करण्यापूर्वी आणि नंतरही अनेक गोष्टींचा त्याग केला आहे.
(१०.४.२०२१)
|