दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा !- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि कॉप्स विद्यार्थी संघटनेची मागणी !
परीक्षा रहित झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शुल्क परत करणार, हे अगोदरच का घोषित केले जात नाही ? विद्यार्थी संघटनांना अशी मागणी का करावी लागते ?
पुणे – राज्यशासनाने वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्यातील दहावीच्या परीक्षा रहित केल्या आहेत. राज्यातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामुळे राज्य मंडळाकडे ६६ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. दहावीच्या परीक्षा रहित झाल्याने पर्यवेक्षकांना देण्यात येणारे मानधन, भरारी पथकांचा व्यय आदी व्यय होणार नसल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे आणि कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. परीक्षा शुल्क परत देण्याच्या मागणीविषयी राज्यशासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.