वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी…
वर्ष २००० नंतर जसजसे इंटरनेट, खासगी दूरचित्रवाहिनी, भ्रमणभाष यांचा बोलबाला वाढला, तसतसा लोकांचा हळूहळू वाचनातील रस न्यून होत गेला. एक काळ असा होता की, उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांच्या पुस्तकांवर उड्या पडायच्या. तिच जागा सध्या ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ने घेतली आहे. आज काही झाले की, कुणी संदर्भासाठी पुस्तके शोधण्याच्या ऐवजी ‘गूगल’चाच वापर करतात. आज पुस्तकेही ‘ऑडिओ बूक्स’, ‘किंडल’ अशा स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे एकूणच वाचनसंस्कृतीकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. असे असतांना लोकांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी, ती रुजावी म्हणून दक्षिण सोलापूरच्या हत्तरसंग कुडल या गावातील रहिवासी काशिनाथ भतगुणकी आणि केरळमधील ‘चालतीबोलती लायब्ररीयन’ म्हणून ओळखल्या जाणार्या ६४ वर्षीय के.पी. राधामणी यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे.
काशिनाथ भतगुणकी यांनी मागील १८ वर्षांत ७ सहस्रांहून अधिक पुस्तकांचा संग्रह केला आहे. ते आपल्या ‘ड्रिम फाऊंडेशन’ या संस्थेच्या वतीने लहान मुले आणि मोठ्या व्यक्ती यांना विनामूल्य पुस्तके वाचण्यास देतात, तर ६४ वर्षीय के.पी. राधामणी या केरळमधील वायनाड आणि आसपासच्या भागांमध्ये अवघ्या ५ रुपयांत घरपोच पुस्तकांची सेवा देतात. ‘महिलांना घरपोच पुस्तके देण्यात मला आनंद वाटतो. पुष्कळ मुली स्पर्धा परिक्षांची पुस्तके वाचून यशस्वी होतात, हेच माझे मोठे यश आहे’, असे के.पी. राधामणी या सांगतात.
आपल्याकडे अनेक प्रसिद्ध पुस्तके, ग्रंथ, कादंबरी लिहिणारे लेखक होऊन गेले आहेत. त्यांचे अनुभव, विचार, ज्ञान, तसेच इतिहासातील प्रसंग यांच्या वाचनामुळे कळत नकळत आपल्या मनावर संस्कार होत असतात. जगात कुठेही नसेल, अशी अध्ययन आणि अध्यापन परंपरा भारताने निर्माण केली आहे. वाचन क्रियाच अशी आहे की, ज्यामध्ये आपल्याला शब्दांची ओळख होत असते. तो शब्द कसा आणि कुठे वापरायचा, याचेही ज्ञान वाचनाने होते. योग्य वयात योग्य पुस्तक हातात येणेही तितकेच महत्त्वाचे असते. लहान वयात मुलांना इतिहास, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे चरित्र अशी पुस्तके वाचण्यास दिल्यास त्यांच्यात वाचनाची आवड निश्चित निर्माण होईल आणि हे सर्व आजच्या पालकांच्या हातात आहे !
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर