सातारा जिल्हा रुग्णालयासह कस्तुरबा रुग्णालयात केवळ १०० जणांनाच लस !
संथ गतीने लसीकरण झाल्यास कोरोनाला प्रतिबंध कसा करणार ? नागरिकांच्या मनात शंका
सातारा, २८ एप्रिल (वार्ता.) – कोरोनाचा प्रभाव थोपवण्यासाठी शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणाकडे वळत आहेत. यामुळे प्रत्येक लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होऊन सामाजिक अंतर राखण्याचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. याविषयी रुग्णालय व्यवस्थापनाकडे तक्रारी गेल्यानंतर रुग्णालयाने केवळ १०० नागरिकांना लसीकरण करण्याची युक्ती लढवली आहे. त्यामुळे प्रतिदिन केवळ १०० रुग्णांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे; मात्र अशा संथ गतीने लसीकरण झाल्यास कोरोनाला कसा प्रतिबंध करणार याविषयी नागरिक शंका व्यक्त करत आहेत.
कोरोना लसीकरणासाठी नागरिक पहाटे ६ वाजल्यापासून लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावत आहेत; मात्र मास्क, सॅनिटायझर, समाजिक अंतर न राखणे यामुळे कोरोनाचे नियम नागरिकांकडून पायदळी तुडवले गेले. यामुळे आरोग्य विभागाने प्रत्येक लसीकरण केंद्राला मर्यादित साठा देण्याचे ठरवले. यानुसार प्रतिदिन केवळ १०० डोस देण्यात येत आहेत. त्यातही ७५ डोस नागरिकांना आणि २५ कोरोना योद्ध्यांना देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा होत आहे. केंद्राबाहेरील नागरिकांना केवळ १०० जणांना डोस देणार असल्याचे सांगूनही नागरिक केंद्राबाहेर गर्दी करत आहेत.
लसीकरण केंद्राबाहेर फलक लावणे आवश्यक !आरोग्य विभागाने ठरवलेले प्रतिदिन १०० लसीकरणाचे उद्दिष्ट लसीकरण केंद्राबाहेर फलकावर लिहिणे आवश्यक होते; मात्र त्यांनी लसीकरण केंद्राबाहेर कोणताही फलक लावलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिक लसीकरणासाठी लांबून आले होते; मात्र सकाळी १०.३० वाजताच लसीचा कोटा संपल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. |