परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवापूर्वी त्यांच्या साधकांप्रतीच्या प्रीतीचे स्मरण होऊन त्यांच्या चरणी कवितारूपी मनःपुष्पे वाहिल्याने शब्दातीत अवस्था अनुभवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाचे विचार येऊन कृतज्ञता वाटणे आणि त्यांच्याशी सूक्ष्मातून संवाद साधणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचे विचार माझ्या मनात जन्मोत्सवापूर्वी ५ दिवस अगोदरपासून येत होते. त्या वेळी मला वाटले, ‘त्यांची प्राणशक्ती अत्यल्प असूनही केवळ सर्व साधकांना आनंद मिळावा; म्हणून ते सर्व साधकांना दर्शन देणार आहेत.’ हा विचार येऊन माझे मन कृतज्ञतेने भरून आले आणि त्यांच्याशी सूक्ष्मातून संवाद साधला गेला.

कु. रजनीगंधा कुर्‍हे

२. गुरुदेवांचे चरण काश्याच्या वाटीने घासल्यावर त्यातून हिरवे आणि काळे विषारी द्रव बाहेर येणे, त्यांच्या चरणांना स्पर्श झालेले हात चैतन्याने पिवळे होणे अन् त्यांना बरे वाटावे; म्हणून त्यांनाच प्रार्थना करणे

त्या वेळी मी गुरुदेवांच्या खोलीत सूक्ष्मातून गेले. तेव्हा मला वाटले, ‘त्यांचे पाय काश्याच्या वाटीने घासावे, जेणेकरून त्यांच्या शरिरातील उष्णता अल्प होईल.’ या विचाराने मी त्यांचे चरण काश्याच्या वाटीने घासायला घेतलेे. तेवढ्यात मला त्यांच्या चरणांतून हिरवे आणि काळे द्रव स्रवतांना दिसले. ‘ते द्रव त्यांच्या शरिरात येण्याचे कारण, म्हणजे त्यांनी साधकांवर होणारी अनिष्ट शक्तींची आक्रमणे स्वतःवर घेतल्याने तेच विष त्यांच्या शरिरात साचले आहे’, असे मला जाणवले; मात्र माझे हात त्यांच्या चरणांतील चैतन्याने पिवळे झाले असल्याचे जाणवले. हे पाहून माझ्या डोळ्यांत अश्रू आले; कारण सूक्ष्मातून हे सगळे अनुभवतांनाही त्यांनी मला त्यांच्या चरणांतून स्रवणार्‍या द्रवातून केवळ चैतन्यच दिले. तेव्हा ‘दिवस-रात्र अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी झटणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना बरे वाटावे; म्हणून कुणाला प्रार्थना करू ?’, असे मला तीव्रतेने वाटले. ‘माझ्यासारख्या मूढ आणि अबोध मुलीची त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची काय पात्रता ?’, असे मला वाटले आणि गुरुदेवांनाच प्रार्थना झाली, ‘आपणांस केवळ आपणच बरे करू शकता.’

३. जनमोत्सवानिमित्त गुरुदेवांच्या चरणी कवितारूपी मनःपुष्पे वहाणे

काही वेळाने मला ‘त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या चरणी मी काय वाहू ? माझ्याकडे तर काहीच नाही’, असे वाटले. मन आणि बुद्धी त्यांचीच देणगी आहे. केवळ अंतरात्मा आहे, जो त्यांच्यात विलीन होण्याची कितीतरी युगांपासून वाट पहातो आहे. त्या वेळी मला स्वतःचा विसर पडला. काही वेळाने माझ्या मनात विचार आला, ‘गुरुदेव सर्व साधकांना जन्मोत्सवाच्या वेळी कुठल्या रूपात दर्शन देतील ?’ तेव्हा त्यांचे नेहमीचे सदरा घातलेल्या मनोहारी रूपाचे दर्शन झाले. नंतर ‘त्यांच्या चरणी मनःपुष्पे वहावीत’, असे वाटून मनात ३ पुष्पांचा विचार आला. ते ३ पुष्प सूक्ष्मातून त्यांच्या चरणी वाहिल्यावर मनात पुढील कविता सुचली आणि मन शब्दातीत झाले.

४. प्रेमाच्या ऋणानुबंधाचे पुष्प बांधिले प्रत्येक साधकाच्या मना ।

जन्मोत्सव अनुभवला अंतरी या क्षणा ।
गुरुवर बैसिले हृदयी या अमृतक्षणा ॥ १ ॥

चरणी वाहिले तीन पुष्प त्यांच्या ।
पहिले अनंत शब्दांनी युक्त कृतज्ञता ।
दुसरे संपूर्ण शरणागती या अपूर्व चरणा ।
तिसरे प्रेमाच्या ऋणानुबंधाचे ।
जे बांधिले त्यांनी प्रत्येक साधकाच्या मना ॥ २ ॥

शेवटी फुलांची माळ बनली, ती होती क्षमायाचनेची ।
अशी ही अनुपम जन्मोत्सवाची सिद्धता अंतरी जाहली ॥ ३ ॥

पाठ शिकविला त्यांनी स्थुलातून सूक्ष्माकडे जाण्याचा ।
नमन माझे त्या निर्गुण गुरुतत्त्व चरणा (टीप) ॥ ४ ॥

टीप – परात्पर गुरु डॉ. आठवले आता संपूर्ण निर्गुणात गेल्याचे वाटून त्यांच्या देहधारी रूपाला नमन होण्याऐवजी गुरुतत्त्वाला आपोआप नमन झाले.

वरील सर्व अनुभवल्यानंतर मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पुष्कळ आठवण आली आणि वाटले ‘त्यांना तर आदि नाही आणि अंतही नाही. केवळ साधकांच्या मनाशी त्यांनी जोडलेले भावबंध पाळण्यासाठी ते हे सगळे करतात.’ अशा थोर गुरुमाऊलीला सर्व साधकांच्या अंतरात्म्याचा अनंत कोटी शिरसाष्टांग नमस्कार !’

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, गोवा.