सिंधुदुर्गातील कोरोनाविषयीच्या अन्य घडामोडी कणकवलीत आणखी एक लसीकरण केंद्र चालू करण्याची शिवसेनेची मागणी

कणकवली – येथील उपजिल्हा रुग्णालय हे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठीचे एकच केंद्र असल्याने तेथे मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे शहरातील कणकवली महाविद्यालयात आणखी एक लसीकरण केंद्र चालू करावे, अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते सुशांत नाईक, कन्हैया पारकर, शहरप्रमुख शेखर राणे, तसेच तहसीलदार आर्.जे. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ उपस्थित होते.

मालवण येथे मामा वरेरकर नाट्यगृहात कोराना प्रतिबंधक लस देण्यात येणार

मालवण – कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी आता नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात नागरिकांना लस देण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर २७ एप्रिलला पालिका प्रशासनाने नाट्यगृहास भेट देत पहाणी केली. पुढील लस उपलब्ध झाल्यानंतर नाट्यगृहाच्या ठिकाणीच नागरिकांना लस दिली जाणार आहे, तर लसीचा दुसरा डोस ग्रामीण रुग्णालयात दिला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे आणि नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.

ज्येष्ठ आणि दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांना प्राधान्याने लस देण्याची मागणी

सावंतवाडी – शहरातील ज्येष्ठ नागरिक, तसेच दुर्धर आजाराने त्रस्त असलेले नागरिक यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी, अशी मागणी नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक परिमल नाईक यांनी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांच्याकडे केली आहे.

कणकवली नगरपंचायतीचे ‘कोविड केअर सेंटर’ अनुमती न मिळाल्याने चालू करता येत नसल्याचा आरोप

कणकवली – शहर नगरपंचायतीच्या माध्यमातून येथील पर्यटन सुविधा केंद्रात अद्ययावत् २५ खाटांची सोय असलेले ‘कोविड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे; मात्र प्रशासनाने अनुमती न दिल्याने ते चालू करता आलेले नाही. हे केंद्र चालू करण्यात प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला आहे.

‘कोविड केअर सेंटर’ला अनुमती न मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांनी ‘नगरपंचायतीने उभारलेल्या ‘कोविड केअर सेंटर’ला तात्काळ मान्यता द्यावी’, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.