प्रारब्ध संपवण्याचे महत्त्व, पाप-पुण्य आणि कर्मफल !
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे
१. इतरांमुळे प्रारब्धभोग संपण्यास साहाय्य होणे
‘एखादी व्यक्ती, उदा. पती, पत्नी, शेजारी, नातेवाईक अथवा अन्य आपल्याशी अयोग्य प्रकारे वागतात’, असे आपल्याला वाटते. प्रत्यक्षात ते आपल्या प्रारब्धानुसार आपल्या जवळ आलेले असतात आणि ‘बुद्धी प्रारब्ध सारिणी’ या उक्तीनुसार ते तसे वागून आपल्याशी असलेले देवाण-घेवाण हिशोब संपवत असतात. अशा प्रकारे ते आपले प्रारब्धभोग भोगून संपवण्यास साहाय्य करत असतात.
२. प्रारब्धभोगाची तीव्रता अल्प करून आनंद उपभोगण्यासाठी साधना हाच उपाय असणे
‘इतरांमुळे आपल्याला त्रास होतो’, असे वाटणे, याचा अर्थ ‘आपण त्यांना मागील जन्मात त्रास दिलेला आहे आणि आता तो देवाण-घेवाण हिशोब पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्रास भोगावा लागत आहे’, असे आहे. असे असतांना, ‘इतरांना दोष देणे कितपत योग्य आहे ? प्रारब्धभोगाची तीव्रता अल्प करून ते भोग आनंदाने भोगता येण्यासाठी साधना तीव्र करून गुरुकृपा संपादन करणे’, हाच त्यावरील उपाय आहे.
३. इतर लोकांचा त्रास म्हणजे प्रारब्ध संपणे
एखादे लहान मूल एखाद्याचा धक्का लागून पडते, तेव्हा ते मोठ्याने रडते; परंतु तेच मूल धावतांना पडते, तेव्हा ‘आपल्याला काही लागले आहे का ?’ या विचाराकडे दुर्लक्ष करून ते न रडता उठते.
त्याचप्रमाणे ‘जेव्हा इतर लोक मला त्रास देतात, तेव्हा मला वाईट वाटते’; परंतु जेव्हा हे ‘देवाणघेवाण हिशोबामुळे घडते आहे’, म्हणजे ‘ही माझ्या कर्माची फळे आहेत’, हे साधना केल्यामुळे एखाद्याला कळते, तेव्हा त्यांच्याविषयी वाईट न वाटता ‘देव माझे प्रारब्ध संपवत आहे’, या विचारांमुळे त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहातो.’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)