‘ऑनलाईन’ परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या खर्या गुणवत्तेचा विकास होईल का ?
‘कोरोनाच्या संसर्गामुळे मागील काही मासांपासून विविध क्षेत्रांतील परीक्षा ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात आल्या. ‘या परीक्षा घेण्याच्या पद्धतींतील त्रुटींमुळे केवळ सोपस्कार म्हणून घेण्यात आल्या’, असे वाटले. ‘अशा परीक्षांतून विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता लक्षात येणे कठीण आहे आणि चांगली गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची यामुळे हानीही होत आहे’, असे प्रकर्षाने जाणवले. ‘या परीक्षा पद्धतींतील उणिवा सर्वांच्या लक्षात याव्यात’, यासाठी बी.एस्.सी.च्या द्वितीय वर्षाची ‘ऑनलाईन’ परीक्षा देतांना माझ्या लक्षात आलेल्या त्रुटी पुढे दिल्या आहेत.
१. ‘ऑनलाईन’ परीक्षेचा अपलाभ उठवून विद्यार्थ्यांनी कॉपी करणे
कोरोनामुळे बी.एस्.सी.च्या द्वितीय वर्षाची सत्र परीक्षा ‘ऑनलाईन’ स्वरूपात घेण्यात आली. ‘विद्यार्थी त्या ३ घंट्यांतील कोणत्याही एका घंट्यात विद्यापिठाने दिलेल्या पोर्टलवर ‘लॉग इन’ करून परीक्षा देऊ शकत होते’, असे या परीक्षेचे स्वरूप होते. यामध्ये जो विद्यार्थी प्रथम ‘लॉग इन’ करत असेल, तो परीक्षेचे सर्व प्रश्न अन्य विद्यार्थ्यांना पाठवत असे आणि अन्य विद्यार्थी उत्तरे शोधून ‘लॉग इन’ करून प्रश्नांची उत्तरे लिहित असत.
२. परीक्षेसाठी ‘लॉग इन’ आणि ‘पासवर्ड’ मिळालेली कोणतीही व्यक्ती परीक्षा देऊ शकणे
विद्यापिठाने पाठवलेल्या पोर्टलवर ‘लॉग इन’ करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक ‘लॉग इन आयडी’ आणि ‘पासवर्ड’ दिला होता. याचा अर्थ ज्या व्यक्तीकडे ‘लॉग इन आयडी’ आणि ‘पासवर्ड’ असेल, तो विद्यापिठाच्या पोर्टलवर ‘लॉग इन’ करून संबंधित विद्यार्थ्याची परीक्षा देऊ शकत होता.
३. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी संकेतस्थळाचे साहाय्य घेणे
अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेतील प्रश्न कळल्यावर त्यांची उत्तरे शोधण्यासाठी संकेतस्थळांचे साहाय्य घेतले असल्याचेही लक्षात आले.
४. मित्र-मैत्रिणींनी एकत्रित पेपर सोडवणे
माझ्या काही मित्र-मैत्रिणींनी ‘व्हॉट्सअप’वर एक गट बनवला होता. त्या गटाच्या साहाय्याने त्यांनी एकत्रितपणे परीक्षा दिली, उदा. एका पानावर १० प्रश्न असल्यास चौघांनी मिळून त्यांची उत्तरे शोधायची आणि मग परीक्षा चालू असलेल्या पोर्टलवर उत्तरे लिहायची.
५. विद्यार्थ्यांचे परीक्षेचे गांभीर्य अल्प होणे
अशा प्रकारे घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे परीक्षेविषयीचे गांभीर्य अल्प झाले आहे. या परीक्षांमुळे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा खरा विकास होणार आहे का ? ज्या विद्यार्थ्याने खरोखर अभ्यास करून परीक्षा दिली असेल, त्याची मोठी हानी होऊ शकते. ‘ऑनलाईन’ परीक्षेच्या अशा स्वरूपामुळे ‘परीक्षा केवळ नावालाच आहेत’, असे वाटते.’
– एक साधिका