मी अनेक भक्तीगीते गाऊ शकले, ही देवाचीच कृपा ! – अनुराधा पौडवाल, सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका
कला ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. हिंदु धर्माने ६४ कला सांगितल्या आहेत. प्रत्येक कला ही भगवंताशी जोडण्याचा साधनामार्ग आहे. कलियुगात धर्मशिक्षणाच्या अभावामुळे कलेचा उपयोग केवळ पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी होतो. या दैवी देणगीचा उपयोग नश्वर गोष्टींसाठी करण्यापेक्षा ईश्वरप्राप्तीसाठी करून जीवनाचे सार्थक करावे, अशी हिंदु धर्माची शिकवण आहे.
मुंबई – मला कायमच भक्तीगीतांविषयी विशेष आकर्षण आहे. लहान असल्यापासून मला भक्तीगीते आवडायची; पण जेव्हा मी चित्रपटात गायला लागले, तेव्हा काही काळ मी भक्तीगीतांपासून लांब होते. १२ वर्षे चित्रपटांत गायल्यानंतर मला असे वाटले की, मी देवासाठी काहीच गायले नाही; तेव्हा मी देवीकडे प्रार्थना केली की, ‘देवी असे काहीतरी कर की, माझे नाव प्रत्येक हिंदु मंदिराशी जोडले जाईल आणि खरेच ही देवाचीच कृपा आहे की, मी अनेक भक्तीगीते गाऊ शकले, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी केले. नुकतेच ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वरील वक्तव्य केले.