(म्हणे) ‘कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जाण्यास केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच उत्तरदायी !’ – असदुद्दीन ओवैसी

रमझानच्या काळात कोरोना नियमांचे उल्लंघन करून गर्दी केली जाते, मशिदीत जाऊन नमाजपठण केले जाते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही का ? कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सरकारला उत्तरदायी ठरवतांना ओवैसी यांनी स्वतःच्या धर्मबांधवांना सुनावण्याचेही धारिष्ट्य दाखवावे !

डावीकडून नरेंद्र मोदी आणि असदुद्दीन ओवैसी

भाग्यनगर (तेलंगाणा) – कोरोना नियंत्रणाबाहेर जाण्यास केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच उत्तरदायी आहेत. गेल्या वर्षी लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगितले होते, त्याने काय झाले ? देशातून कोरोना पळाला का? मोदी यांनी रुग्णालयांतील सुविधा का वाढवल्या नाहीत ? केंद्र सरकार तेव्हापासून झोपले होते का ? राजधानित ऑक्सिजन का अल्प पडत आहे ? आपण ‘आत्मनिर्भर भारत’ आहोत, तर सौदी अरेबिया, रशिया आणि इतर देशांचे साहाय्य का घेत आहोत ?, अशा शब्दांत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

ओवैसी यांनी केंद्र सरकारवर केलेली टीका

१. मृतांचे दफन केले जात आहे. मृतदेह जाळले जात आहेत. मोदी सरकार अदृश्य झाले आहे.

२. आमच्याकडे खासदार फंड असता, तर आम्हाला लोकांना ऑक्सिजन अथवा औषधे देता आली असती; मात्र आता काहीही नाही. मोदी सरकारने पीएम् केअर्स फंडातील पैसे काढून राज्य सरकारांना द्यायला हवेत जेणेकरून त्यांना कोरोना लसीकरणाचा वेग वाढवता येईल.

३. सध्या देशात कोरोना लसींच्या तुटवड्याची चर्चा चालू आहे. असे असेल, तर यापूर्वीच फायझर आस्थापनाला भारतात लस उत्पादित करण्याची अनुमती का देण्यात आली नाही ?

४. प्रसारमाध्यमांवर टीका करतांना ओवैसी म्हणाले की, मोदींच्या माध्यम चमचांनो, जागे व्हा. आपले स्वतःचेच लोक मरत आहेत. आता तरी मोदी यांचा बाजा वाजवणे थांबवा.