कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी साडेआठ सहस्र रुपयांची मागणी !

पिंपरीतील भाटनगर स्मशानभूमी येथील प्रकार !

  • व्यक्तीच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेणार्‍या आणि मृताच्या टाळूवरचे लोणीही खायला मागेपुढे न पहाणार्‍या अशा निगरगट्ट लोकांना अद्दल घडेल अशी शिक्षा व्हायला हवी.
  • जनतेनेही भावनेच्या भरात कृती न करता अशा वेळी संबंधित अधिकार्‍यांना संपर्क करून अशा लोकांचे गैरवर्तन थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

पिंपरी – पिंपरीतील भाटनगर स्मशानभूमी येथे कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी साडेआठ सहस्र रुपये घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. काही महापालिका कर्मचारी खासगी व्यक्तींना हाताशी धरून पैसे घेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित व्यक्तीने ‘गोवर्‍या आणि लाकडे महानगरपालिका विनामूल्य देते ना ?’, असे विचारले असता त्याला ‘नाही’, असे उत्तर दिल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. खरेतर महापालिकेच्या वतीने अंत्यसंस्कारासाठी लागणार्‍या गोवर्‍या आणि लाकडे विनामूल्य आहेत, असे २५ एप्रिल या दिवशी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. तसेच कोणी पैसे मागितल्यास भ्रमणभाष क्रमांक दिला असून त्यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे. या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील काय कारवाई करणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.