सर्व हिंदु संघटनांची ‘हिंदु राष्ट्रा’ची एकच मागणी असेल, तर त्याची स्थापना होईल ! – श्रीमज्जगद्गुरु स्वामी रामसुभगदेवाचार्य
राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणारी हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
हरिद्वार – अनेक चित्रपटांतून हिंदु श्रद्धास्थानांचे विडंबन होत आहे. हिंदु मुलींना धर्मांध पळवून नेत आहेत. मंदिरांतील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात येत आहे. हिंदु धर्मावर होणारे सर्व आघात थांबवणे आवश्यक आहे. तुम्ही चित्रकूट येथे आल्यानंतर आपण सर्व मिळून गावागावांतील लोकांना संघटित करूया. वर्तमानकाळात सर्व संतांनी हिंदु राष्ट्राची मागणी करणे आवश्यक आहे; कारण आता हिंदु राष्ट्राची मागणी न केल्यास हिंदूंना पुन्हा तशी मागणी करता येणार नाही. हिंदु राष्ट्राची मागणी हिंदुस्थानात करायला हवी, ती पाकिस्तानात करून चालेल का ? आताच आपण प्रयत्न केल्यानंतर हिंदु राष्ट्र येईल. आपण स्वतःची ओळख जात म्हणून नव्हे, तर ती ‘हिंदू’ म्हणून करून द्यावी. सर्व हिंदु संघटनांची ‘हिंदु राष्ट्र’ हीच एक मागणी असेल, तर त्याची स्थापना होईल, असे मार्गदर्शन मध्यप्रदेशातील राजगढमधील साकेतधाम आश्रमाचे श्रीमज्जगद्गुरु स्वामी रामसुभगदेवाचार्य (विनैका बाबा) यांनी केले.
येथे झालेल्या कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवण्यात आले. या अंतर्गत विविध आखाड्याचे संत, महंत आणि महामंडलेश्वर यांची समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांसह समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा, धर्मप्रेमी श्री. संजीव पुंडिर आदींनी भेट घेतली. या वेळी हिंदु राष्ट्राची स्थापना, राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, विविध माध्यमांद्वारे होणारे देवतांचे विडंबन, लव्ह जिहाद अन् आतंकवाद, हिंदुसंघटन आदी अनेक विषयांवर समिती करत असलेल्या कार्याविषयी माहिती अवगत करून संतांचे आशीवार्द घेण्यात आले. तसेच या भेटीच्या वेळी साधूसंतांना कुंभमेळ्यामध्ये लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याविषयी निमंत्रण देण्यात आले.
‘लव्ह जिहाद’द्वारे धर्मांतर आणि साधूंच्या हत्या यांविरोधात हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – श्री राधा मोहन शरण देवाचार्य महाराज
‘लव्ह जिहाद’द्वारे धर्मांतर आणि साधूंच्या होत असलेल्या हत्या यांविरोधात हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. यासाठी मी कुंभमेळ्यात सर्व संतांची बैठक घेण्याचे नियोजन करत आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेले धर्माचे कार्य पाहून मी प्रसन्न झालो. तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. तुमचे प्रदर्शन पहाण्यासाठी मी येईन, तसेच आमच्या येथे प्रतिदिन जे प्रवचन होते, ते झाल्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी वेळ देण्यात येईल, असे मार्गदर्शन गोवर्धन येथील जगद्गुरु स्वयंभू रामदेव आचार्य पिठाधिश्वर श्री राधा सर्वेश्वर सेवा संस्थानचे श्री राधा मोहन शरण देवाचार्य महाराज यांनी केले.
राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांविषयी संघटित होणे आवश्यक ! श्री श्री १००८ श्री महंत ओमकार आनंद महाराज
राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांविषयी संघटित होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन गुजरात (श्रीमाधोपूर) येथील सीताराम बावडी आश्रमाचे श्री श्री १००८ श्री महंत ओमकार आनंद महाराज यांनी केले. ते षड्दर्शन साधू मंडळाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.
धर्मकार्य करण्यासाठी केंद्रांतील हिंदूंच्या शासनाने स्वतःहून प्रयत्न करायला हवेत ! – स्वामी तीर्थदास महाराज
आज हिंदूंना हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हिंदूंना त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करावे लागते; परंतु याची आवश्यकता असायलाच नको; कारण केंद्रात हिंदूंचे शासन आहे. धर्मकार्यासाठी या शासनाने स्वतःहून प्रयत्न करायला हवेत. धर्मकार्यासाठी मी प्रयत्न करत आहे. तुमच्या कार्याला आमचे पूर्ण समर्थन आहे, असे मार्गदर्शन अयोध्या येथील स्वामी तीर्थदास महाराज यांनी केले. या वेळी येथील श्री महंत बिहारी शरण उपस्थित होते.
संपूर्ण हिंदुस्थानात संस्कृत भाषा आणायची आहे ! – श्री महंत चंद्रमादास त्यागी, हरिद्वार
राष्ट्राला संस्कृतीची आवश्यकता आहे. जागतिक संस्कृतीकडे भारत देश जात असतांना येथील संस्कृतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. माझी ७० वर्षांपूर्वीची संस्कृत शाळा असून तिला वाढवायचे आहे. आम्हाला संपूर्ण हिंदुस्थानात संस्कृत भाषा आणायची आहे. आम्ही धर्मप्रसार करण्यासाठी सर्व मंदिरात सेवा करत आहोत. देशात कठोर कायदे सिद्ध करण्यासह समान नागरी कायदा (सिव्हिल कोड) लागू करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन येथील श्री महंत चंद्रमादास त्यागी यांनी केले.
अन्य भेटी
श्री. घनवट यांनी हरिद्वार येथील श्री महंत डॉ. नरसिंहदास, मध्यप्रदेश येथील श्री श्री बालकदास महाराज आणि गुजरात येथील मोटेरा सूर्य मंदिराचे महामंडलेश्वर अवधकिशोर महाराज यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.