सोलापूर शहरातील नादुरुस्त रुग्णालयांच्या दुरुस्तीसाठी पावणे चार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला संमती !
कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यकता भासल्यानंतर नादुरुस्त रुग्णालयांची दुरुस्ती करण्यासाठी प्रस्ताव देणे म्हणजे ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्या’सारखेच आहे. प्रशासनाने अन्य सर्व जिल्ह्यांतील रुग्णालयांचा आढावा घेऊन तीही तात्काळ चालू करावीत, म्हणजे रुग्णांची गैरसोय होणार नाही.
सोलापूर – जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेडची कमतरता भासू नये यासाठी शहरातील सोलापूर महानगरपालिकेल्या नादुरुस्त रुग्णालयांच्या दुरुस्तीसाठी पावणे चार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला संमती दिल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या रुग्णालयांमुळे २५० खाटांची व्यवस्था होणार आहे.
नियोजन भवन येथे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहरातील कोविड-१९ संबंधित उपाययोजनांविषयी आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या वेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्ल्याणशेट्टी यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.