कुडाळ येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी निर्णय
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी लागणार्या ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. सिंधुदुर्गसाठी ऑक्सिजन सिलिंडर भरून (रिफील करून) आणणार्या ‘ओम साई एजन्सी’च्या वतीने कुडाळ येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी लागणारी अनुमती आणि आवश्यक भूमी यांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक असणारे ऑक्सिजन सिलिंडर रिफील करण्याच्या नियोजनाच्या संदर्भात २६ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची बैठक झाली. या वेळी अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर आमदार नाईक म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा होत आहे. भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी योग्य नियोजन केले जात आहे. ओरोस येथे एक ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित असून कुडाळ महिला बाल रुग्णालयात देखील ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याविषयी कार्यवाही चालू आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर भरून आणणार्या ‘ओम साई एजन्सी’द्वारे कुडाळ येथे आणखी एक ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे नियोजन चालू आहे. याविषयी या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. या प्रकल्पासाठी कुडाळ एम्.आय.डी.सी. येथील भूखंड मिळवून देण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सहमती दर्शवली आहे.’’