कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर गर्दी
कणकवली – येथील उपजिल्हा रुग्णालयात २६ एप्रिलला पुन्हा एकदा लसीकरण मोहीम चालू करण्यात आली. या वेळी लस घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. यामुळे शासनाच्या कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या नियमांचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.
लसीकरणाची प्रसिद्धी केल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी
कणकवली – राजकीय पक्षांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी पुष्कळ प्रसिद्धी केल्याने, तसेच लसीकरण केंद्रांपर्यंत जाण्यासाठी वाहनांची विनामूल्य सुविधा केल्याने केंद्रांवर प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, याचे भान राजकीय पक्षांनी ठेवले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी केले आहे.
आचरा येथील शासकीय विश्रामगृहात ‘कोविड केअर सेंटर’ चालू करण्याची मागणी
मालवण – जिल्ह्यासह मालवण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील आचरा येथील शासकीय विश्रामगृहाची सर्व सोयींनी युक्त असलेली इमारत कह्यात घेऊन या ठिकाणी ‘कोविड केअर सेंटर’ चालू करावे, अशी मागणी मालवण पंचायत समितीचे उपसभापती राजू परुळेकर यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.
देवगड येथे ‘कोविड केअर सेंटर’चे उद्घाटन
देवगड – भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने १२० खाटांची सुविधा असलेले कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याचा शुभारंभ प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. येथील तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहाच्या नव्या इमारतीत हे केंद्र चालू करण्यात आले आहे. यातील ५० खाटा या नगरपंचायत कार्यक्षेत्रासाठी राखीव आहेत, तर उर्वरित खाटा देवगड तालुक्यासाठी उपलब्ध असणार आहेत. यापूर्वी जामसंडे येथे असलेले कोविड केअर सेंटर बंद करून तेथील रुग्णांना नवीन सेंटरमध्ये हालवण्यात आले आहे.
कुंभारमाठ, मालवण येथील ‘कोविड केअर सेंटर’मध्ये आरोग्य सुविधा वाढवण्याच्या सूचना
मालवण – शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी तालुक्यातील कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनातील कोविड केअर सेंटरची पहाणी करून तेथील रुग्णसेवेचा आढावा घेतला. ‘या सेंटरमधील खाटांची संख्या वाढवून १०० करावी, तसेच अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांसह अन्य अत्यावश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही करा’, अशा सूचना खासदार राऊत आणि आमदार नाईक यांनी प्रशासनास दिल्या आहेत. याविषयी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशीही चर्चा करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गात कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू
१. गेल्या २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १९७
२. उपचार चालू असलेले रुग्ण २ सहस्र ८९४
३. बरे झालेले एकूण रुग्ण ८ सहस्र ४४३
४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ११ सहस्र ६२३
५. मृत्यू झालेले एकूण रुग्ण २८०