४५ वर्षांपेक्षा न्यून वय असलेल्या पनवेलच्या २ नगरसेवकांना महानगरपालिकेकडून लसीकरण !

पनवेल, २६ एप्रिल (वार्ता.) – ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून नोंदणी केल्याचे सांगणार्‍या ४५ वर्षांपेक्षा न्यून वय असलेल्या पनवेलच्या २ नगरसेवकांना महानगरपालिकेकडून लस देण्यात आली. सर्वसामान्यांसाठी लसींचा तुटवडा असतांना आणि राज्य किंवा केंद्र शासनाचे कोणतेही आदेश नसतांना प्रशासनाने त्यांना कोणत्या नियमानुसार लस दिली, असा प्रश्‍न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

१. पनवेल महानगरपालिकेचे ४२ वर्षीय सभागृह नेते परेश ठाकूर आणि २६ वर्षीय नगरसेविका रुचिता लोंढे यांनी कोरोनाची लस घेतली. सामाजिक माध्यमांवर या दोघांची छायाचित्रे प्रसिद्ध होऊ लागली. त्यानंतर अनेक प्रश्‍न निर्माण झाले.

२. सामान्यांसाठी लसींचा तुटवडा असतांना या दोघांना लस कशी मिळाली ? सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी लस कशी घेतली ? असेही प्रश्‍न विचारले जात आहेत.

३. याविषयी महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर म्हणाले, ‘‘लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात सर्व नगरसेवकांनी ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून कोरोनाची लस घेण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले होते. त्यानुसार नगरसेवकांनी लस घेतली.’’

४. ‘दुसर्‍या टप्प्याचे लसीकरण चालू झाल्यानंतर महानगरपालिकेतून नगरसेवकांना भ्रमणभाष करण्यात आले होते, तसेच लसीसाठी कागदपत्रे जमा करण्याविषयी फेब्रुवारीतच सांगण्यात आले. त्या वेळी आम्ही महानगरपालिकेकडे नोंदणी केली होती. त्यानुसार आम्ही लस घेतली’, असे परेश ठाकूर आणि रुचिता लोंढे यांचे म्हणणे आहे.