लस उपलब्ध असल्याची निश्चिती करूनच लसीकरणासाठी जावे ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
मुंबई – मुंबईत ७ खासगी आणि ३० शासकीय रुग्णालये अन् कोविड सेंटर अशा ३७ ठिकाणी कोरोनावरील लसीकरण चालू आहे. लसींचा साठा टप्प्याटप्प्याने केंद्रावर आणला जातो. त्यामुळे नागरिकांनी माहिती घेऊनच लसीकरण केंद्रांवर जावे. त्यामुळे त्यांची होणारी धावपळ टाळता येईल, असे आवाहन मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी २५ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी सौ. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘‘लसींचा साठा सकाळी १० वाजता येतो आणि त्यानंतर तो रुग्णालये, कोविड सेंटर येथे पाठवला जातो. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व स्तरांवर नियोजन करण्याचा प्रयत्न चालू आहे. लसीकरणाला प्रथम येणार्यांना प्राधान्य दिले जाईल. उपलब्ध लसीच्या साठ्याची माहिती फलकावरही दाखवली जाईल. सध्या तरी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा आमचा विचार नाही. वस्तीपातळीवर जाऊन नोंदणी करूनच त्यांना लस देण्याचा विचार पालिका करत आहे. केंद्रशासनाच्या ‘अॅप’च्या माध्यमातूनच लस दिली जाईल.’’