कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अमरावती येथे शववाहिका न मिळाल्याने कोरोना रुग्णांचे २ मृतदेह शाळेच्या बसमधून स्मशानभूमीत पोचवले !

अमरावती – जिल्ह्यात कोरोनामुळे निधन होणार्‍यांची संख्या इतकी वाढली आहे की, मृतदेह नेण्यासाठी शववाहिका अथवा रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांचा मृतदेह चक्क शाळेच्या बसमधून स्मशानभूमीत पोचवावा लागत आहे. शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात निधन झालेल्या २ कोरोना रुग्णांचे मृतदेह एकाच शाळेच्या बसमधून स्मशानभूमीत नेण्यात आले.


राजकारण्यांच्या त्रासामुळे पुणे येथील डॉक्टर आणि कर्मचारी यांची काम थांबवण्याची चेतावणी !

पुणे – शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे जेवण, स्वच्छता आणि सुरक्षारक्षकांची सोय असल्याने ही कामे मिळवण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते (नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते) प्रयत्न करीत आहेत. उपचार व्यवस्थेची विचारपूस करण्याऐवजी उपचारांवरील व्यय, त्याची कारणे यांचा हिशोब राजकारणी मंडळी मागत असल्याने नाराज झालेल्या डॉक्टरांनी काम थांबवण्याची चेतावणी दिली आहे. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी डॉक्टरांची बैठक घेऊन सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. (नागरिकांना साहाय्य करण्याचे सोडून स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्यासाठी धडपडणारे लोकप्रतिनिधी जनहित काय साधणार ? – संपादक)  गेल्या वर्षभरापासून या कामाचे कंत्राट एका एजन्सीकडे असल्याने अन्य ठेकेदार नेमण्यास जम्बोच्या व्यवस्थापनाचा नकार आहे. त्यामुळे राजकीय दबाव आणून ही कामे मिळवण्याची धडपड राजकीय कार्यकर्ते करत आहे.

उपचार व्यवस्थेत अडथळे आणण्याची लोकप्रतिनिधींची भूमिका अयोग्य आहे. कंत्राट मिळवण्यासाठी दबाव आणणार्‍या लोकप्रतिनिधींवर ‘साथरोग नियंत्रण कायद्यां’तर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.


उत्तरप्रदेशमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जागाच उपलब्ध नाही !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – उत्तरप्रदेशमध्ये अनेक ठिकाणी कोरोनामुळे मृत पावलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात जागाही शिल्लक राहिलेली नाही. अंत्यसंस्कार होण्यासाठी बरेच दिवस वाट पहावी लागत आहे. मृतदेह  वेटिंग लिस्टवर ठेवले आहे.

आगरा शहरातील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ३ दिवस वाट पहावी लागत आहे. एका व्यक्तीचे निधन झाल्यावर स्मशानभूमीत जागाच नसल्याने मुलाने ९० किमी प्रवास करून अलीगडमध्ये जाऊन अंत्यसंस्कार केले.

पूर्व देहलीतील ५ स्मशानभूमींपैकी सीमापुरी स्मशानात परिस्थिती सर्वांत वाईट आहे. अंत्यसंस्काराचे १२ फलाट अल्प पडत असल्याने स्मशानभूमीजवळ असणार्‍या देहली महानगरपालिकेच्या वाहनतळाच्या जागेवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.


कोरोनाबाधिताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाच घेणार्‍या धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषदेच्या कर्मचार्‍याचे निलंबन !

धाराशिव – जिल्ह्यातील तुळजापूर नगर परिषदेतील बामणी येथील एका मृत रुग्णाच्या कुटुंबियांकडून अंत्यसंस्कार लवकर करण्यासाठी तुळजापूर नगर परिषदेचे कर्मचारी शंकर कांबळे यांनी ५ सहस्र रुपयांची लाच घेतली. या घटनेची माहिती कळताच मुख्याधिकारी आशिष शेलार यांनी तात्काळ कांबळे यांना निलंबित केले आहे.

२३ एप्रिल या दिवशी तुळजापूर येथे १३ मृत कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. (मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची वृत्ती संतापजनक आहे ! अशा कर्मचार्‍यावर केवळ निलंबनाची कारवाई न करता त्याला कायमस्वरूपी घरचा रस्ता दाखवायला हवा, असे जनतेला वाटते ! – संपादक)


बीड येथे रेमडेसिवीर इंजेक्शनची २२ सहस्र रुपयांना विक्री करणार्‍या ३ जणांना अटक

बीड – येथे रेमडेसिवीर इंजेक्शन २२ सहस्र रुपयांना विक्री केल्याच्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ३ जणांना कह्यात घेतले आहे. यांना न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळ्याबाजाराचा मुख्य सूत्रधार हा एका खासगी कोविड रुग्णालयाचा कंपाऊंडर आहे. मित्राच्या साहाय्याने तो गरजू ग्राहकांना या इंजेक्शनची विक्री करत होता.

येथील शिवाजीनगर पोलिसांनी माने कॉम्प्लेक्स परिसरात सापळा रचून इंजेक्शन विक्री करतांना संतोष नाईकवाडे याला कह्यात घेतले होते. त्यानंतर झालेल्या चौकशीतून अन्य दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.  संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org