अमरावती येथील कामगाराने सापडलेले ९७ सहस्र रुपये पोलिसांना परत केले !

असे प्रामाणिक कामगार सर्व क्षेत्रांत हवेत !

प्रतिकात्मक छायाचित्र

अमरावती – जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील शासनाच्या रोजगार हमी योजनेत काम करणारे कामगार रामदास जिचकार यांनी त्यांना सापडलेले ९७ सहस्र रुपये प्रामाणिकपणे पोलिसांकडे स्वाधीन केले. जिचकार यांचा प्रामाणिकपणा पाहून पोलिसांनी त्यांचा सत्कार केला. जिचकार हे सामाजिक वनीकरणाच्या कामावर मोलमजुरी करतात. २५ एप्रिल या दिवशी सकाळी ते दापोरी ते मायवाडी रस्त्यावरील झाडांना पाणी घालण्यासाठी लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आणण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना त्या पाण्यामध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल चिखलामध्ये पडून असल्याचे आढळून आले. त्यांनी ही माहिती तेथील वनपाल एस्.एस्. काळे यांना दिली. त्यानंतर रामदास जिचकार यांनी या नोटाचे बंडल घेतले आणि मोर्शी पोलीस ठाण्यात जाऊन सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. (कोरोना संकटाच्या काळात कोरोनाबाधित आणि त्यांचे नातेवाईक यांची लुबाडणूक करणार्‍यांनी रामदास जिचकार यांच्याकडून प्रामाणिकपणा शिकावा ! – संपादक)