हिंगोली येथील औषध विक्रेत्याचा परवाना रहित करण्याची भरारी पथकाची शिफारस !
रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा अन् विक्रीचा ताळमेळ न जुळल्याचे प्रकरण
असे पथक सर्व जिल्ह्यांत स्थापन करून औषध दुकान आणि रुग्णालय यांतील औषध साठा पडताळला पाहिजे !
हिंगोली – रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्थापन केलेल्या भरारी पथकाने शहरातील ‘दिवेश मेडिकल’ या दुकानाची पडताळणी केली. तेव्हा तेथे इंजेक्शनचा साठा आणि विक्री यांचा ताळमेळ आढळून आला नाही. या कारणास्तव औषध विक्रेत्याचा परवाना रहित करण्याची शिफारस प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या साहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.
या पथकामध्ये प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांचा समावेश आहे. या पथकाने २३ एप्रिल या दिवशी ‘जगदंब कोविड रुग्णालया’ची अचानक पडताळणी केली. या ठिकाणी ११ रुग्णांच्या धारिका (फाईल्स) पडताळण्यात आल्या. त्यामध्ये औषधी दुकानदार ‘दिवेश मेडिकल’ यांचे चालक, तसेच फार्मासिस्ट यांनी रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनच्या पावत्या दिलेल्या नाहीत. रुग्णालयाच्या धारिकांमध्येही इंजेक्शनच्या पावत्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा आणि विक्री केलेल्या इंजेक्शनची संख्या यांचा ताळमेळ कुठेही जुळत नसल्याचे स्पष्ट झाले.